महाविकास आघाडीने आम्हाला गृहीत धरू नये,अपक्ष आमदारांचा इशारा

अपक्ष आमदारांना धोकेबाजाची उपमा देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची नावे जाहीर केली
महाविकास आघाडीने आम्हाला गृहीत धरू नये,अपक्ष आमदारांचा इशारा

अपक्ष आमदारांनी शिवसेनेच्या संजय पवार यांना मते न देता भाजपच्या धनंजय महाडिक यांना मते दिली. त्यामुळे अपक्ष आमदारांना धोकेबाजाची उपमा देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची नावे जाहीर केली होती. यामुळे अपक्ष आमदारांनी संताप व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीने आम्हाला गृहीत धरू नये. आम्ही आमच्या मर्जीने कोणालाही मतदान करू शकतो, असा इशारा अपक्ष आमदारांनी दिला आहे.

येत्या २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले की, अपक्ष आमदार संजयमामा शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार व अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी महाविकास आघाडीला मतदान केले नाही; मात्र या तिन्ही आमदारांनी राऊत यांचा आरोप खोडून काढला आहे. राऊत यांनी आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे ते म्हणाले. राऊत यांनी आरोप करताना सांगितले की, “काही घोडे हे चढ्या किमतीला विकले गेले. त्यांनी आम्हाला आश्वासन देऊनही आम्हाला मतदान केले नाही.” राऊत यांच्या या वक्तव्याबद्दल अपक्षांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवाला अपक्षांना जबाबदार धरू नये, असा इशारा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. भुयार यांनी राऊत यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. राऊत यांनी स्पष्टीकरण देऊन माझा मतदारसंघातील मतदारांचा गैरसमज दूर करावा, अशी मागणी भुयार यांनी केली.

दरम्यान, महाविकास आघाडीला मतदान न केल्याचा राऊत यांचा दावा अपक्ष आमदार संजय शिंदे यांनीही फेटाळला आहे. “मी स्वाभिमानी नेता असून मी घोडेबाजारात सहभागी झालेलो नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मी मतदान केले आहे.” नांदेडचे अपक्ष आमदार एस. एस. शिंदे म्हणाले की, “मी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे. मी महाविकास आघाडीला मतदान केले आहे.’’

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in