मुंबई : मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली असून प्रदूषणाचा धोका वाढला आहे. वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होत असून जकात नाक्यावर स्वच्छता ठेवा, असे निर्देश पालिका प्रशासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिले आहेत.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासह प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. धुळीचे कण पसरू नये, यासाठी रस्त्यांवर पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. बांधकाम ठिकाणी स्प्रिंकलर बसवणे, ३५ फूट उंच भिंत उभारणे, अशी नियमावली जारी केली आहे. प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले असून जकात नाक्यावर दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होण्याचा धोका अधिक आहे. हवेतील प्रदूषण नियंत्रित आणण्याबाबत उपाययोजना आखल्या जात असतानाच, मुंबईच्या प्रत्येक टोलनाक्यांवर वाहतूककोंडीदरम्यान होणाऱ्या प्रदूषणाबाबतही उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ‘एमएसआरडीसी’ दिले आहेत.
दहिसर, मुलुंड, वाशी, ऐरोली यासह पाच याठिकाणी टोलनाके असून मुंबइच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या रस्त्यांवर एमएसआरडीसीच्या नियुक्त संस्थेकडून टोल वसूल केला जात आहे. टोल वसुलीसाठी वाहने काही मिनिटांसाठी थांबवली जात असून या वाहतूककोंडीदरम्यान प्रदूषणाचा त्रास वाहनचालकांना आणि प्रवाशांना होत असतो. या टोलप्लाझाच्या ठिकाणी वाहनांसह कचऱ्यामुळे प्रदुषणात वाढ होत असल्याने याठिकाणी प्रदूषित हवा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याने महापालिका प्रशासनाने टोल प्लाझा स्वच्छतेसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना सूचित करण्यात यावे, असे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.