विरार रेल्वेस्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड; लोकलचे वेळापत्रक विस्कळीत

विरार स्थानकातील फलाट क्रमांक १चा वापर अप लोकल गाड्यासाठी करण्यात येतो.
विरार रेल्वेस्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड; लोकलचे वेळापत्रक विस्कळीत

पश्चिम रेल्वेवरील विवार स्थानकात मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. विरार स्थानकातील फलाट क्रमांक १ वर सकाळी ७.३४च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होत विलंबाने धावणाऱ्या लोकलचा फटका प्रवाशांना बसला.

विरार स्थानकातील फलाट क्रमांक १चा वापर अप लोकल गाड्यासाठी करण्यात येतो. या फलाटाजवळच सकाळी ७.३४च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे या फलाटाच्या दिशेने गाड्या येऊ शकल्या नाहीत. त्यातच एक वातानुकूलित लोकलही खोळंबली होती. या फलाटावर लोकल येऊ शकत नव्हत्या. परिणामी, विरार येथून चर्चगेटच्या दिशेनेही लोकल सुटू शकल्या नाहीत. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक बिघडले. या प्रकारामुळे लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. दरम्यान, लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांनाही फलाटावर बराच वेळ ताटकळत राहावे लागले. १ तासाच्या सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीनंतर एसी लोकल ८.४५च्या सुमारास सोडण्यात आली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in