मंत्री पंकजा मुंडे भाजपाकडुन पुन्हा डावलल्या गेल्या?

भाजपच्या उमेदवार यादीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट छाप
मंत्री पंकजा मुंडे भाजपाकडुन पुन्हा डावलल्या गेल्या?

विधान परिषदेच्या उमेदवारीची आस बाळगून असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले आहे. पक्षाने मुंडे यांच्याऐवजी माजी मंत्री आणि भाजपचा ओबीसी चेहरा असलेले राम शिंदे यांना संधी दिली आहे. शिंदे हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. भाजपने प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांना फेरउमेदवारी नाकारून श्रीकांत भारतीय, उमा खापरे या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, तर परिषदेतील मावळते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर विश्वास दाखवत भाजपने पाचव्या जागेवर प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना रिंगणात उतरवले आहे.

भाजपच्या उमेदवार यादीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट छाप दिसत आहे. फडणवीस यांनी आपल्या पसंतीचे उमेदवार देताना पंकजा मुंडे यांना मात्र शह दिल्याचे बोलले जात आहे; मात्र पंकजा मुंडे यांना डावलताना ओबीसी उमेदवार राम शिंदे आणि महिला उमेदवार म्हणून भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक उमा खापरे यांना संधी देत समतोल साधला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून काम केलेले आणि सध्या प्रदेश भाजपचे सरचिटणीस असलेले श्रीकांत भारतीय यांना भाजपने संधी दिली आहे. गेली अडीच वर्षे विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणारे प्रवीण दरेकर यांच्यावर बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल असतानाही भाजपने त्यांना संधी दिली आहे. फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे प्रसाद लाड यांना भाजपने पाचवा उमेदवार म्हणून घोषित केल्याने विधान परिषद निवडणूक चुरशीची होणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in