मुंबई : बांधकाम साहित्यासाठी घेतलेल्या बारा लाखांचा अपहार करुन एका बिल्डरची फसवणुक झाल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी इस्माईल सय्यद आणि आलमभाई या दोन आरोपीविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. प्रमोद पांडुरंग पिसाळ हे कुर्ला येथे राहत असून ते व्यवसायाने बिल्डर आहे. त्यांची स्वतची एक खाजगी कंपनी असून या कंपनीने कुर्ला परिसरात काही एसआरए प्रकल्प पुर्नविकासाठी घेतले होते.
बांधकामासाठी त्यांना स्टिल, सिमेंट, विटासह इतर साहित्यांची गरज असते. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक मित्र इस्माईल सय्यदने त्यांना जितूभाईशी माहिती दिली होती. जितूभाई अशा निर्माणधीन इमारतीमध्ये फ्लॅट विकत घेतो आणि त्यामोबदल्यात त्यांना बांधकाम साहित्याचा पुरवठा करतो असे सांगितले होते. हा व्यवहार चांगला वाटल्याने त्यांनी जितूभाईशी भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची भेट न झाल्याने इस्माईलने त्यांची ओळख आलमभाईशी करुन दिली. त्यांचा स्टिलचा कारखाना असून ते त्यांना स्टिलचा पुरवठा करतील असे सागितले. त्यासाठी त्यांनी इस्माईल आणि आलम यांना बारा लाख रुपये दिले होते. मात्र दिलेल्या तारखेत त्याने त्यांना स्टिलचा साठा पाठवून दिला नाही.
याबाबत विचारणा केल्यानंतर इस्माईलने या संपूर्ण प्रकरणातून स्वतचे अंग काढून घेत आलमकडे विचारणा करण्यास सांगितले. अशा प्रकारे इस्माईल आणि आलम या दोघांनी त्यांच्या बारा लाखांचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी नेहरुनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.