पोकळ शब्दांचे खोडसाळ नेते! उद्धव ठाकरेंवर भाजपचा पलटवार

आमच्या पंतप्रधानांच्या कुटुंबावर तर बोलू नकाच, एकेरीत अजिबातच बोलू नका
पोकळ शब्दांचे खोडसाळ नेते! उद्धव ठाकरेंवर भाजपचा पलटवार

मुंबई : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. भाजपकडून त्याला आता चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस धार्जिणी भूमिका घेतली. हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनबद्दल उद्धव ठाकरे गप्प का, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. तर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना ठाकरेंनी १० वर्षात १ हजार ५३१ घोषणा केल्या. काय झाले पुढे त्यांचे? त्यामुळे यांच्या शब्दाला किंमतच नाही. उध्दव ठाकरे म्हणजे ‘पोकळ शब्दांचे खोडसाळ नेते’ आहेत, असे टीकास्त्र सोडले आहे.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेचा भाजपने समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता असल्याचे सांगून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर काँग्रेस धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. खरं तर हिंदुत्वाचा वारसा मिळूनही उद्धव ठाकरे यांना इंडीया आघाडीचे गोडवे गावे लागत आहेत. पंतप्रधान मोदींचे कर्तृत्व संपूर्ण देशानं मान्य केलं आहे. पण, उध्दव ठाकरे त्यांच्यावर टीका करत आहेत. खरं तर ती त्यांची पात्रता नाही. संपूर्ण देश मोदीजींचं कुटुंब आहे, पण ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना ते कळणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

उध्दव ठाकरे म्हणजे ‘पोकळ शब्दांचे खोडसाळ नेते’ आहेत, अशी टीका करताना आशिष शेलार म्हणाले, ‘‘पंतप्रधानांच्या कुटुंबाचा विषय तुम्हीच काढलाय तर मग तुम्हालाही काही प्रश्नाची उत्तरे द्यावे लागतील. सांगा उध्दवजी की, तुम्ही तुमच्या सख्ख्या भावा विरोधात न्यायालयात लढलात की नाही? तुमचे तुमच्या वहिनी सोबत कौटुंबिक नाते आहे की भांडण? वडिलांची मालमत्ता तुम्ही हडप केली म्हणून तुमच्याच सख्या भावाने आरोप केले की नाही? चुलत भावाला घराबाहेर, पक्षातून बाहेर काढण्यात तुम्हाला आनंद मिळाला की नाही, असे कुटुंबातील बरेच विषय निघतील. त्यामुळे आमच्या पंतप्रधानांच्या कुटुंबावर तर बोलू नकाच, एकेरीत अजिबातच बोलू नका. यापुढे पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केलात तर आमचे नेते पण तुमचा अपमान करतील. तो सहन करण्याची तयारी ठेवा,’’ असा इशाराही शेलार यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in