मनसेचे नेते संदीप देशपांडेंच्या अडचणी वाढल्या अटकपूर्व जामिनावर १७ मे रोजी सुनावणी

मनसेचे नेते संदीप देशपांडेंच्या अडचणी वाढल्या
अटकपूर्व जामिनावर १७ मे रोजी सुनावणी

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू केले. मनसेचे नेते संदीप देशपांडेंना ताब्यात घेण्यासाठी गेले असता देशपांडेंनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गाडीचा धक्का लागल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. याप्रकरणी देशपांडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याविरोधात सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर १७ मे रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे; मात्र देशपांडे यांना अटकेपासून कोणताही दिलासा न मिळाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

राज ठाकरे यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश दिले होते. ४ मे रोजी ठिकठिकाणी मनसैनिकांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यभरात पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी गेले असता, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे गाडीमधून बसून पळून गेले. गाडी भरधाव वेगात नेताना महिला पोलीस कर्मचार्‍याला धडक बसली आणि त्या जागेवरच कोसळल्या होत्या. महिला कर्मचारी खाली पडल्यानंतरही संदीप देशपांडे यांनी गाडी न थांबवता घटनास्थळावरून पळ काढला. त्यातच देशपांडेंची गाडी चालवणार्‍या चालकाला आणि मनसेचे शाखाध्यक्ष संतोष साळीला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष साळी आणि चालक यांच्याविरोधात कलम ३०८, ३५३, २७९ आणि ३३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी साळी आणि चालक या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांना सापडत नसलेल्या देशपांडे आणि धुरी यांनी अटकेची टांगती तलवार असल्याने सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे; मात्र मंगळवारी संबंधित न्यायालयाचे न्यायधीश गैरहजर असल्याने सुनावणी १७ मेपर्यंत निश्‍चित केली आहे. तोपर्यंत देशपांडे आणि धुरी यांना अटकेपासून कोणतेही संरक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या असून, केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in