
उन्हाची रखरख जाणवत असताना साधारण लोकलमधून प्रवास करण्याऐवजी एसी लोकलला प्रवाशांकडून प्राधान्य देण्यात येत आहे; मात्र असे असले तरी काहीअंशी आजही एसी लोकलबाबत प्रवाशांची नाराजी विविध घटनांनमधून दिसून येत आहे. मध्य रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलबाबत नकारात्मक भूमिका असणाऱ्यांकडून लोकलच्या काचेच्या खिडक्यांना टार्गेट करण्यात येत आहे. मागील वर्षभरात जवळपास एसी लोकलवरील ५० हून दगडफेकीच्या घटना प्रशासनाकडून नोंदवण्यात आल्या आहेत.
एसी लोकलच्या तिकीटदरात सवलत देण्यात आल्यापासून एसी लोकलच्या प्रवासीसंख्येत कमालीची वाढ होत आहे; मात्र दुसऱ्या बाजूला काही समाजकंटकांकडून या लोकलना लक्ष्य करण्याचे प्रयत्नही वाढू लागले आहेत. गेल्या तीन-चार महिन्यांत मध्य रेल्वेमार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी वातानुकूलित लोकलवर दगडफेक करण्यात आल्याच्या २३ घटना घडल्या आहेत. तर वर्षभरात एकूण ५०हून अधिक घटना घडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे एसी लोकलबाबत काही प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, यापैकी बहुतेक प्रकरणे हार्बर मार्गावर नोंदवली गेली आहेत. यामध्ये विशेषत: चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द, कुर्ला स्थानकांदरम्यानचा सर्वाधिक घटनांचा समावेश आहे. तर मागील वर्षभरात पश्चिम रेल्वेवरदेखील दगडफेकीच्या अथवा चोरीच्या १०हून अधिक घटनांची नोंद झाली आहे.