मुंबई : मुंबई महापालिकेचे उपायुक्त आणि एम पश्चिम विभागाचा कार्यभार सांभाळणारे विश्वास मोटे यांनी इटली येथे २१ सप्टेंबर रोजी झालेली ‘आयर्नमॅन इटली एमिलिया रोमाग्ना’ ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.
एड्रियाटिक समुद्रात पोहणे, दुचाकी चालवणे आणि धावणे अशा तीन अत्यंत आव्हानात्मक प्रकारांत ही स्पर्धा पार पडली. मोटे यांनी एकूण १५ तास २५ मिनिटे आणि ०४ सेकंदात या तीनही प्रकारांतील स्पर्धा पूर्ण करून यश संपादन केले. या यशाबद्दल महानगरपालिका प्रशासनाने मोटे यांचे कौतुक केले आहे. शारीरिक क्षमतेचा कस लागणारी खडतर अशी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन स्पर्धा ओळखली जाते आणि खूप कमी लोक यात यशस्वी होतात. २१ सप्टेंबर रोजी ‘आयर्नमॅन इटली एमिलिया रोमाग्ना’ ही स्पर्धा इटलीतील सेर्व्हिया या निसर्गरम्य परिसरात पार पडली. यात जगभरातील विविध देशांतील २ हजार ४३९ स्पर्धक सहभागी झाले होते. तर, भारतातील २८ स्पर्धकांनीही यात सहभाग नोंदवला होता. विश्वास मोटे या स्पर्धकांपैकीच एक आहेत. त्यांनी एड्रियाटिक समुद्रात पोहणे, दुचाकी चालवणे आणि धावणे हे तीनही प्रकार १५ तास २५ मिनिटे आणि ४ सेकंदात पूर्ण करुन ‘आयर्नमॅन’ हा किताब मिळवला.
नोव्हेंबर २०२२ मध्ये गोव्यात पार पडलेल्या ‘आयर्नमॅन ७०.३’ या स्पर्धेद्वारा विश्वास मोटे यांनी या प्रवासाला सुरुवात केली होती. गोव्यातील स्पर्धेत मोटे यांनी १.९ किलोमीटर अंतर ५० मिनिटे २७ सेकंदात पोहून पूर्ण केले होते. त्यानंतर ९० किलोमीटर अंतर ३ तास ४९ मिनिटे आणि ३६ सेकंदांच्या कालावधीत दुचाकी चालवून तर २१.९ किलोमीटर अंतर २ तास २१ मिनिटे आणि ५९ सेकंद अवधीमध्ये धावून पूर्ण केले होते.
शरीराकडे लक्ष द्या !
‘आयर्नमॅन’ किताब मिळवल्यानंतर मोटे यांनी म्हटले की, २०१६ पर्यंत मी शारीरिक तंदुरुस्तीकडे जास्त लक्ष दिले नव्हते. पण, त्यानंतर जॉगिंगपासून सुरुवात केली. हळूहळू त्यात शिस्तबद्धता, सातत्य आणि सचोटीच्या बळावर स्वत:ला अधिक कणखर बनवत गेलो. दृढनिश्चय, समर्पण आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ‘फिटनेस चार्ट’ तयार केला. यामुळे, स्वत:चा आत्मविश्वास दुणावल्यानंतर तंदुरुस्तीविषयक स्पर्धांमध्ये भाग घेणे सुरू केले. आज आयर्नमॅनसारखा प्रतिष्ठित गौरवापर्यंत पोहोचता आले, याचा अभिमान आहे. शरीर तंदुरुस्त असेल तर आपण खूप काही करू शकतो. माझ्या या यशापासून प्रेरित होऊन इतरांनीही शरीर, व्यायामाकडे लक्ष द्यावे.