मुंबई : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपीस वनराई पोलिसांनी अटक केली. संदीप ओमप्रकाश सिंग असे या आरोपीचे नाव असून त्याचा दुसरा सहकारी फरार आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
या टोळीने अलीकडेच एका फॅशन डिझायनर महिलेचा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे. ३२ वर्षांची तक्रारदार महिला ही फॅशन डिझायनर असून ती तिच्या आईसोबत कांदिवली येथे राहते. १४ जुलैला रात्री पावणेअकरा वाजता ती तिच्या मित्राला भेटण्यासाठी कांदिवलीतील ग्रोवल मॉलजवळ रिक्षाने जात होती. ही रिक्षा महानंदा, गोरेगाव येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, महानंदा डेअरीजवळ आली असता मागून बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने तिच्या हातातील आयफोन हिसकावून तेथून पलायन केले होते. तिने बाईकचा क्रमांक बघितला असता बाईकच्या मागील बाजूस नंबर क्रमांक नव्हता. घडलेला प्रकार तिने वनराई पोलिसांना सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून दोन दिवसांपूर्वी संदीप सिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने व त्याच्या मित्रानेच तिचा मोबाईल हिसकावून पलायन केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली.