आजपासून सांताक्रुझमध्ये रंगणार व्यंगचित्र महोत्सव; ४० व्यंगचित्रकारांना भेटण्याची संधी, १०० व्यंगचित्रांचा खजिना खुला होणार

ज्येष्ठ आणि नवोदित ७२ व्यंगचित्रकारांची १०० व्यंगचित्रे पाहण्याची व जवळपास ४० लोकप्रिय व्यंगचित्रकारांना भेटण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची अनोखी संधी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे.
आजपासून सांताक्रुझमध्ये रंगणार व्यंगचित्र महोत्सव; ४० व्यंगचित्रकारांना भेटण्याची संधी, १०० व्यंगचित्रांचा खजिना खुला होणार
Published on

मुंबई : ज्येष्ठ आणि नवोदित ७२ व्यंगचित्रकारांची १०० व्यंगचित्रे पाहण्याची व जवळपास ४० लोकप्रिय व्यंगचित्रकारांना भेटण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची अनोखी संधी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. निमित्त आहे ते ५ व ६ मे रोजी सांताक्रुझ (पूर्व) येथील ओला वाकोला हॉल येथे आयोजिलेल्या कार्टुन महोत्सवाचे. हा महोत्सव सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत रसिकप्रेक्षकांसाठी विनामूल्य खुला आहे.

५ मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन असून यानिमित्त ‘कार्टुनिस्ट्स कंबाईन’चे अध्यक्ष संजय मिस्त्री, शिवसेना आमदार संजय पोतनीस व ओला वाकोलाचे संस्थापक संदेश चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्टुन महोत्सव आयोजिण्यात आला आहे.

महोत्सवाच्या निमित्ताने व्यंगचित्रांच्या अनोख्या दुनियेच्या आठवणी जागविताना मिस्त्री म्हणाले की, विचार, भावना आणि सामाजिक मुद्दे व्यक्त करण्यासाठी वापरली जाणारी अनोखी कला म्हणजे व्यंगचित्रे होय. व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे अधिक प्रभावी माध्यम आहे. व्यंगचित्रकारांच्या रेषा बोलतात, विचार करायला लावतात व मनपरिवर्तनदेखील करतात. त्यातूनच व्यंगचित्रकाराची ओळख जनमानसाच्या मनावर कायमची कोरली जाते.

अलिकडच्या काळात समाजातील ढोंगावर व्यंगचित्रांच्या माध्यमातून नेमकेपणाने बोट ठेवले जाण्याची मानसिकता लोप पावत चालली आहे. अशा परिस्थितीत समाजात जागल्याचे काम करणाऱ्या व्यंगचित्रकारांच्या निडर शैलीची नितांत आवश्यकता आहे. हाच संदेश या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वच घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले असून त्यात व्यंगचित्रकार व नागरिक यांच्यात प्रत्यक्ष संवाद होण्याची अपेक्षा आहे.

व्यंगचित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने जगभरातील काही मोजक्या शैलीदार व्यंगचित्रकारांची थोडक्यात ओळख करून देण्यात आली आहे.

डेव्हिड लो

डेव्हिड लो हा मूळचा न्यूझीलंडचा व्यंगचित्रकार. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेला. महायुद्धाच्या काळात त्याने हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन, चर्चिल या त्या काळातील नेत्यावर असंख्य व्यंगचित्रे रेखाटली.

बोल्ड, ठळक रेषा ही त्याची वैशिष्ट्ये. रेषा जशा बोल्ड असायच्या तशा त्याच्या कल्पनाही बोल्ड असायच्या. त्याच्या कल्पनाचे वैशिष्ट्य म्हणजे जे आपण शब्दातून बोलतो ते तो चित्रात म्हणजे व्यंगचित्रात रेखाटायचा. उदा. ‘तो नेता एका ठोशाचा आहे’ तर डेव्हिड लो आपल्या व्यंगचित्रात भला मोठा हात दाखवायचा. त्या हातावर ‘जनतेचा आवाज’ असे लिहायचा आणि लहान आकारात नामोहरण झालेला नेता दाखवायचा. त्याच्या व्यंगचित्रात प्रपोर्शन अफलातून असायचे. म्हणजे एखादा नेता राजकीयदृष्ट्या बलवान असेल तर तो चित्रात त्याला मोठा दाखवायचा आणि समोरचा नेता लहान दाखवायचा. त्यातून दोघांचे राजकारणातील स्थान कळून येत असे. एखादे निसर्ग चित्र पहावे तसे त्याच्या चित्रांचे रेखाटन असायचे. एखाद्या नेत्याचे अर्कचित्र करण्यासाठी तो संसदमध्ये जाऊन त्या नेत्यांची देहबोली, उभे राहण्याची, चालण्याची ढब यांचा अभ्यास करायचा आणि मगच ते चित्रातून दाखवायचा. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, नेत्यांचे वाढते वय, बदललेले शरीर तो आपल्या कलाकृतीतून अचूक दाखवायचा. काळाबरोबर चालणे म्हणजे काय हे त्यांच्या व्यंगचित्रांच्या शैलीतून नेमकेपणाने उमटत होते.

बाळासाहेब ठाकरे

दीनानाथ दलाल यांनी चित्रकार म्हणून एक काळ गाजविला. त्यांनी व्यंगचित्रेही रेखाटली. ती व्यंगचित्रे पाहून बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार बनले. दीनानाथ दलाल यांना लेखक अनंत काणेकर कल्पना देत. दलाल चित्र रेखाटत. कल्पना देणारे लेखक असल्यामुळे कल्पनाही सकस असे. त्यात लेखकांच्या लिखाणाची, शब्दाचे वजन असायचे. लेखक आणि चित्रकार यांची एक प्रकारची ती जुगलबंदी असायची.

बाळासाहेब यांच्या घरी विचारवंत, समाजसुधारक, प्रबोधनकार होते. त्यांच्या विचारांचा बाळासाहेब यांच्या व्यंगचित्रावर प्रभाव दिसतो. बाळासाहेबांनी आपल्या व्यंगचित्रात म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा वापर केला. उदाहरण द्यायचे तर ‘नाकी नऊ आले’ हे व्यंगचित्र देता येईल. त्यावेळी नऊ राज्यात काँग्रेस व्यतिरिक्त सरकारे आली होती. बाळासाहेबांनी त्या राज्यांचे मुख्यमंत्री इंदिरा गांधींच्या लांब नाकावर बसले आहेत, असे दाखवले होते. इंदिरा त्रासलेल्या दाखविल्या आणि चित्रावर ‘नाकी नऊ आले’ असे लिहिले. अशा म्हणी, वाक्यप्रचार यांचा उपयोग केलेला बाळासाहेबांच्या वेळोवेळीच्या व्यंगचित्रातून केल्याचे दिसते.

शंकर पिल्लई

डेव्हिड लो याच्या प्रभावाने व्यंगचित्रकार बनलेले आणखी एक भारतीय व्यंगचित्रकार म्हणजे शंकर पिल्लई. डेव्हिड लो याच्या चित्रातील बरीचशी साम्यस्थळे शंकर यांच्या व्यंगचित्रामधूनही उमटलेली पाहायला मिळतात.

शंकर यांनी आपल्या व्यंगचित्रात काव्यात्मक कल्पनाचा वापर केला आहे. जेव्हा भाषिक वाद झाला, हिंदी भाषा राष्ट्रभाषा करण्याचे ठरले तेव्हा शंकर यांनी असे एक व्यंगचित्र रेखाटले की त्यात नेहरूंना ‘हिंदी ‘नावाची बाई आपल्याकडे ओढत आहे. त्याचप्रमाणे तमिळ, मल्ल्याळम, बंगाली, तेलगू या भाषा त्यांचे पाय ओढून स्वतःकडे ओढत आहेत. त्यातून नेहरू यांना इतर भाषा हिंदीकडे जाऊ नका, असेच सांगत आहेत. प्रत्यक्ष वादात न पडता त्यांनी भाषिक वादावर रेषांच्या फटकाऱ्यातून बोट ठेवले होते.

वॉल्ट डिस्ने

कुणाच्याही शैलीचा प्रभाव नसलेला, कोणतीही राजकीय व्यंगचित्रे न रेखाटता जगभर लोकप्रिय झालेला व्यंगचित्रकार म्हणजे वॉल्ट डिस्ने. त्यांच्या व्यंगचित्राचे विशेष म्हणजे चित्रातील गोडवा. सुरेख, रेखीव, आखीव रेषा. त्यापेक्षा त्यांनी प्राणी, पक्षी यांना बोलते केले. त्यांनाही विचार असतात, त्यांच्याही काही समस्या असतात. ते माणसासारखे बोलू लागले, माणसासारखे कपडे घालू लागले तर काय करतील हे वॉल्ट डिस्ने यांनी आपल्या हास्यचित्रातून दाखविले. मिकी माऊसने तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. जगभरातील अनेक मोठे नेतेही त्याचे चाहते बनले. निसर्गातील रंग किती आकर्षक असतात याची ओळख चित्रातून डिस्ने यांनी दिली. त्याचप्रमाणे गाजलेल्या गोष्टी, परीकथा यांना आकर्षक स्वरूपात पडद्यावर आणण्याचे ऐतिहासिक काम वॉल्ट डिस्ने यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in