कोस्टल रोडची गळती रोखण्याचे काम आणखी २ आठवडे चालणार; १५० ते २०० मीटर लांबीच्या लेनवर काम सुरू, वाहतूकीवर परिणाम नाही

मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गिकेच्या बोगद्यातील गळती रोखण्याचे काम मुंबई महापालिकेकडून सुरू असून ते आणखी दोन आठवडे सुरू राहणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गिकेच्या बोगद्यातील गळती रोखण्याचे काम मुंबई महापालिकेकडून सुरू असून ते आणखी दोन आठवडे सुरू राहणार आहे. नुकत्यात लोकार्पण केलेल्या कोस्टल रोडला गळती लागल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेने याची तत्काळ दखल घेत गळती रोखण्याचे काम सुरू केले होते.

सुमारे १५० ते २०० मीटर लांबीच्या लेनवर हे काम सुरू आहे. मात्र, हे काम सुरू असताना वाहतुकीला कोणताही अडथळा येत नसल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा, मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाचा ठरलेल्या कोस्टल रोडची वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका मार्च महिन्यात सुरू करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी या मार्गिकेच्या बोगद्यात पाणी गळती होत असल्याचे आढळले. त्यानंतर जून महिन्यातही पाणी गळती सुरू असल्याचे आढळले. त्यामुळे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोगद्यांमधील सांध्यांमधून होणारी गळती रोखण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम जून महिनाअखेरीपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

पॉलिमर ग्राऊंटिग इंजेक्शनद्वारे सुरुवातीला सांध्यांमधून होणारी गळती रोखण्यात आली होती. सद्यस्थितीत कोस्टल रोडचे ८९.२ टक्के काम पूर्ण झाले असून विधानसभा निवडणुकीपूर्वी दक्षिण मुंबईतुन मरीन ड्राईव्ह ते वरळीदरम्यान दुसऱ्या लेनसह संपूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ ऑक्टोबर २०१८ मध्ये झाला. त्यानंतर मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्याने कोस्टल रोड प्रकल्पाचा वेग मंदावला होता. परंतु कोरोना आटोक्यात आल्यानंतर २०२२ पासून कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला गती आली आहे. प्रकल्पाची एकूण किंमत १३,९८४ कोटी रुपये झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in