रक्षकच ठरताहेत बिबट्यांचे भक्षक! रेल्वे तसेच महामार्गांवरील अपघातात बिबट्यांचे वाढते मृत्यू चिंताजनक

वन विभागाच्या पातळीवर विविध उपक्रम राबवूनदेखील गेल्या दोन वर्षांत बिबट्यांचे मृत्यू आणि मनुष्यहानीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली
रक्षकच ठरताहेत बिबट्यांचे भक्षक! रेल्वे तसेच महामार्गांवरील अपघातात बिबट्यांचे वाढते मृत्यू चिंताजनक

मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढत असल्याने वन्यप्राण्यांना जंगलाबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे शिकार, विष प्रयोग, विजेचा धक्का आणि रेल्वे, रस्ते अपघातात वन्य प्राण्यांचा बळी जात आहे. अमरावती व नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्यांना जीव गमवावा लागल्याची आकडेवारी आहे. यांनतर चंद्रपूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो.

राज्यात गेल्या दोन दशकांपासून बिबट्या आणि मनुष्य संघर्ष सुरू आहे. वन विभागाच्या पातळीवर विविध उपक्रम राबवूनदेखील गेल्या दोन वर्षांत बिबट्यांचे मृत्यू आणि मनुष्यहानीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बिबट्याचा मुक्तसंचार मनुष्यासाठी आणि त्याच्यासाठीही घातक ठरतो आहे. राष्ट्रीय, राज्य महामार्गांवरील अपघातामध्ये, रेल्वे अपघात, विहिरीत पडून, विजेचा शॉक बसल्याने दर काही दिवसाला बिबट्यांचे मृत्यू होत आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे वस्तीत शिरणाऱ्या बिबट्यांकडून माणसांवरील हल्लेही वाढले आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून बिबट्यांना संरक्षण आणि नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी विशेष कृती आराखडा करण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी वाघांच्या कातड्याची आंतराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी होती मात्र आता वाघांच्या शिकारीनंतर बिबट्यांना लक्ष केले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाघाप्रमाणे बिबट्याची कातडी, नखे, दात, अवयवांची तस्करी केली जाते. २०१८ मध्ये वनविभागाकडे सादर केलेल्या अहवालात बिबट्यांचा शिकारीसाठी खात्मा केल्याची बाब समोर आली आहे. काही ठिकाणी विषबाधा, मानव आणि वन्यजीव संघर्षातून बिबट्यांना जीव गमवावा लागला. दरम्यान, बहुतांश बिबट्याच्या अधिवासातून महामार्ग आणि रेल्वे मार्ग जात असल्याने हे रस्ते त्यांच्यासाठी जीवघेणे ठरू लागले आहेत. बिबट्याचा नैसर्गिक स्वभाव, वर्तणूक, बदलणाऱ्या परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता व मोठ्या प्रमाणातील प्रजोत्पादनामुळे बिबट्यांच्या संख्या वाढत आहेत. या कारणामुळेच मानव-बिबट्यांचा संघर्ष वाढतो आणि बिबट्यांचे मृत्यू व मानव हानीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

बिबट्यांची संख्या १३ हजारांवर

देशातील बिबट्यांची संख्या २०१८ मध्ये १२,०००च्या वर गेली आहे. ही संख्या २०१४ मध्ये ८०००च्या जवळपास होती. सद्यस्थितीत देशभरात १३ हजारहून अधिक बिबट्या असल्याचे वन्य अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्यांशिवाय वाघ आणि सिंहांची संख्याही देशात वाढली.

अलीकडील काही घटना

- चंद्रपूर येथे मालगाडीच्या इंजिनवर काही महिन्यांपूर्वी बिबट्या मृतावस्थेत आढळला. घुग्घुस येथील न्यू रेल्वे कोल साइडिंग येथील ही घटना होती. सकाळच्या सुमारास मालगाडी चंद्रपूर थर्मल पावर स्टेशनमधून या कोल सायडिंगमध्ये दाखल झाली. त्यावेळी इंजिनच्या वर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. मालगाडीच्या वर चढलेल्या बिबट्याला हाईटेंशन इलेक्ट्रिक ताराचा स्पर्श झाला असावा आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- मागील आठवड्यात दिवा-वसई रेल्वे मार्गावरील कामण भागात पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास रेल्वेगाडीच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शवविच्छेदनानंतर त्याचे शव जाळून नष्ट करण्यात आल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांनी दिली. पहाटे ४ वाजताच्या सुमारास बिबट्याला रेल्वेगाडीने धडक दिल्याची माहिती वन विभागला समजली. त्यावेळी बिबट्याचा अपघात झाल्याने त्याचे पाय तुटल्याचे आढळून आले. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही झाला होता.

या उपाययोजनांचा विचार करणे गरजेचे!

- बिबट्यांचे अधिवास असलेली ठिकाणे ओळखून त्याठिकाणी रस्ते, रेल्वे मार्गिका प्रकल्प न राबवणे.

- प्रकल्प राबवल्यास त्याठिकाणी उंच संरक्षक भिंती बांधणे गरजेचे.

- केवळ वाघ वाचवा अशी टॅगलाईन न ठेवता सर्व वन्यजीव वाचवण्यासाठी शासन दरबारी ठोस पावले.

- वन्य अभ्यासक आणि शासन यांनी एकत्र येत कामकाज करणे.

- बिबट्यांचा अधिवास असणाऱ्या रस्त्यालगत वेग मर्यादेचे पालन त्यासाठी नियंत्रण रक्षक ठेवणे.

- रेल्वे रुळांशेजरी उंच भिंती बांधणे.

बिबट्यांच्या मृत्यूची आकडेवारी

२०१८ - ५००

२०१९ - ४९१

२०२० - १७२

२०२१ - १७८

"बिबट्यांचे अपघाती मृत्यू वाढले आहेत हे सत्य आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नजीक गेल्या वर्षभरात १८ ते २० अपघात झाले आहेत, तर कित्येक लहान प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. रेल्वे प्रशासन देखील मार्गिका वाढवत चालले आहेत. मात्र हे वाढवत असताना आवश्यक उपाययोजना, वन्य जीवांचा विचार करत नसल्याचे अशा अनेक घटनांनी निदर्शनास आले आहे. शासनाकडून आवश्यक उपाययोजना केवळ कागदावर आहेत. शासनाने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर मानवच या मुक्या जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल एवढं नक्की."

- कृष्णा तिवारी, वन्यजीव अभ्यासक

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in