मुंबई : मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर लोकल सेवेसाठी कोकण रेल्वेसारखेच ट्रान्सपोर्ट ऑफ मुंबई हे स्वतंत्र प्राधिकरण जाहीर करावे. तसेच लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी पंधरा डब्यांच्या गाड्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे. प्रवाशांच्या मागण्यांसाठी प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रवाशांनी शुक्रवारी निषेध निदर्शने केली. यावेळी संघटनांनी या मागण्या केल्या.
उपनगरीय लोकल प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी शुभ्र वस्त्र आणि काळ्या फिती लावून निषेध निदर्शने करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार संघटनांनी ठाणे आणि मुंबई परिसरातील विविध रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविरोधात निदर्शने केली. ठाण्यामध्ये निदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला. तर मुंबईत देखील प्रवाशांनी आंदोलनाला प्रतिसाद दिल्याचा दावा संघटनांनी केला. रेल्वे प्रवासी संघटनांच्या वतीने गुरुवारी सकाळी काही स्थानकांवर प्रवाशांना काळ्याफिती वाटण्यात येत होत्या. प्रवाशांना काळ्या फिती लावून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार रेल्वे प्रवाशांनी निषेध निदर्शनात सहभाग नोंदवला. प्रवाशांनी काळ्या फिती लावून लोकल प्रवास केला.