मुंबई : एमएमआरडीएची शिवसेना आमदाराला नोटीस

मुंबई : एमएमआरडीएची शिवसेना आमदाराला नोटीस

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कांजूरमार्ग येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन जागेवर बेकायदा शेड उभारल्याबद्दल शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांना नोटीस बजावली आहे.

ईशान्य भांडुप विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोरगावकर यांनी बांधलेली अनधिकृत शेड पाडण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही. एमएमआरडीए कॉम्प्लेक्सवरील बेकायदेशीर शेडच्या तक्रारी स्थानिक कार्यकर्ते अंकुश कुराडे यांनी ऑक्टोबर २०२१मध्ये पहिल्यांदा केल्या होत्या. “सरकारी मालमत्तेवर बेकायदेशीर शेड बांधण्यासाठी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी निधी दिला,” असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अंकुश कुराडे यांनी केला आहे. तसेच त्यांनी, शिवसेनेचे आमदार रमेश कोरगावकर यांनी केलेल्या बेकायदा शेडच्या बांधकामाविरोधात एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक तक्रारीदेखील केल्या आहेत.

एमएमआरडीएकडे कांजूरमार्ग येथे मेट्रो, झोपडपट्टी पुनर्वसन आणि कोस्टल रोड प्रकल्पांसह विविध पुनर्वसनासाठी १२ इमारती प्रस्तावित आहेत. एमएमआरडीएने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला (एसआरए) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन जागेवर बेकायदा शेड उभारल्याबद्दल परवानगी नाकारल्याचे पत्रदेखील लिहिले होते.

कोरगावकर हे शिवसेनेचे मुंबई महापालिकेचे नगरसेवक होते. २०१७ मध्ये कोरेगावकर मुंबई पालिकेचे स्थायी समिती अध्यक्षही राहिले होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ते ईशान्य भांडुप विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

Related Stories

No stories found.