
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची जगभरात ओळख आहे. पालिका मुख्यालयावरील रोषणाईसाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या मुंबई महापालिकेने ‘आझादी का अमृतमहोत्सव’ साजरा करण्याचे ठरवले आहे. यासाठी ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत बोधचिन्ह विद्युत रोषणाईने उजळणार आहे. यासाठी तब्बल २३ लाख रुपये खर्च करणार असल्याने देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा नादच खुळा आहे.
भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने देशभरात सर्व राज्य सरकार, पालिका तसेच सरकारी उपक्रमांना विशेष कार्यक्रम आखून दिले आहेत. या कार्यक्रमांतर्गत पालिका मुख्यालय, वरळी येथील अभियांत्रिकी हब व इतर कार्यालयांवर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा थ्रीडी एलईडी लाईट लोगो आणि राज्य व पालिकेच्या अधिकृत बोधचिन्हाचे डिझाईन रोषणाईने बनवले जाणार आहे. मुख्यालय आकर्षक फुलांनी सजवले जाणार आहे. रोषणाई डिझाईन, पुरवठा आणि कार्यचलनासाठी पालिकेने निविदा मागवली असून, ती २७ जुलैपर्यंत अंतिम केली जाणार असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर ९ ऑगस्ट क्रांती दिन, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त, आंतरराष्ट्रीय महिला दिन, जागतिक अपंग पुनर्वसन दिन, जागतिक कर्करोग जागृती दिन यासह काही विशिष्ट दिवशी खास संकल्पनेनुसार विद्युत रोषणाई केली जाते. या व्यतिरिक्त दररोज पालिका मुख्यालय रोषणाईने उजळून निघते. ब्रिटिशकालीन वास्तू, आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या पालिका मुख्यालयावरील विद्युत रोषणाई पाहण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्या व इतर दिवशीही पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.