महापालिकेत नवे सहाय्यक आयुक्त; प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याने ऑक्टोबरमध्ये नियुक्ती

गेल्या तीन वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या विभागीय सहाय्यक आयुक्तांचे कारभार प्रभारी आयुक्तांमार्फत चालत होता, पण आता या व्यवस्थेला पूर्णविराम मिळणार आहे. एमपीएससीमार्फत आलेल्या ७ सहाय्यक आयुक्तांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांची नेमणूक होणार असल्याची माहिती महापालिका मुख्यालयातील सूत्रांनी दिली आहे.
महापालिकेत नवे सहाय्यक आयुक्त; प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याने ऑक्टोबरमध्ये नियुक्ती
Published on

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या विभागीय सहाय्यक आयुक्तांचे कारभार प्रभारी आयुक्तांमार्फत हाकला जात आहे. मात्र आता या कारभाराला पूर्णविराम लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून (एमपीएससी) आलेल्या ७ सहाय्यक आयुक्तांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या सर्व सहाय्यक आयुक्तांची नेमणूक होणार असल्याची माहिती महापालिका मुख्यालयातील सूत्रांनी दिली.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. यामुळे नव्याने रूजू होणाऱ्या सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती लांबू शकते, त्यामुळे पालिका प्रशासक तथा आयुक्त भूषण गगराणी यांनी दिवाळीपूर्वीच या नव्या सहाय्यक आयुक्तांच्या हाती कारभार सोपवण्याचे ठरवले आहे. तसेच

प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर ताटकळत ठेवणे योग्य नसल्याने दसऱ्यानंतर नियुक्तीचे आदेश काढण्याचा मानस आहे. त्यामुळे पालिकेच्या

७ विभाग कार्यालयांतील प्रभारी सहाय्यक आयुक्त (कार्यकारी अभियंता) यांना सहाय्यक आयुक्तांचा पदभार रिकामा करावा लागणार आहे. परिणामी महापालिकेच्या ७ वार्डमध्ये पूर्ण वेळ सहाय्यक आयुक्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एमपीएससीने २५ जून २०२५ रोजी मुंबई महापालिकेकडे अनिरुद्ध कुलकर्णी, आरती गोळेकर, संतोष साळुंखे, प्रफुल्ल तांबे, वृषाली इंगळे, रूपाली शिंदे आणि समरिन सय्यद आदींच्या नावांची शिफारस पाठविली होती. मात्र यापैकी समरिन सय्यद या काही व्यक्तिगत कारणामुळे रूजू झाल्या नाहीत. त्याबदल्यात पहिल्या बॅचमध्ये प्रशिक्षण झालेले योगेश देसाई यांची नियुक्ती होणार आहे. अशाप्रकारे आता सर्व नवनियुक्त सहाय्यक आयुक्तांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून फक्त नियुक्ती कार्यालयीन आदेश निर्गमित करण्याचे बाकी आहेत.

हे असणार नवे सहाय्यक आयुक्त

अनिरुद्ध कुलकर्णी

आरती गोळेकर

संतोष साळुंखे

प्रफुल्ल तांबे

वृषाली इंगळे

रूपाली शिंदे

योगेश देसाई

logo
marathi.freepressjournal.in