
उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. गर्दीच्या वेळेत विविध तांत्रिक कारणांमुळे बिघाड होणाऱ्या घटनांमुळे प्रवाशांना कार्यालय तसेच इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी विलंब होत आहे. एप्रिल महिन्यात मध्य रेल्वे मार्गावर लोकल उशिराने धावण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. जवळपास १ हजारहून अधिक लोकल फेऱ्या विलंबाने धावल्याची माहिती उघडकीस आली आहे. तर ४०० हून अधिक लांब पल्ल्यांच्या लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक बिघडल्याच्या घटना घडल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे.
एप्रिल महिन्यात विविध कारणांमुळे जवळपास १ हजारहून अधिक लोकल फेऱ्या उशिराने धावल्या आहेत. यात बाहेरगावाहून येणाऱ्या-जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस विविध कारणांनी विलंबाने धावू लागल्याने त्याचा परिणाम लोकलच्या वेळापत्रकावरही झाला आहे. साधारण लोकलसाहित मेल-एक्स्प्रेसही मागील काही दिवसांपासून विलंबाने धावत आहेत. या लेटमार्कचे आणखी एक कारण म्हणजे मध्य रेल्वेच्या मुख्य तसेच हार्बरवरील रेल्वे फाटक दिवसभर उघडबंद होतात. त्यात वेळा बिघाड झाल्यास फाटके पाच ते दहा मिनिटे खुलीच राहतात. त्यामुळे स्थानिक रहदारी सुरूच राहिल्याने लोकल गाडय़ा थांबवण्याशिवायही पर्याय नसतो. या कारणांमुळे देखील लोकलला विलंब होत असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले.
लोकल विलंबाने धावण्याची कारणे आणि फेऱ्या संख्या -
- सिग्नल, ओव्हरहेड वायर बिघाड व अन्य कारणे - १७१
- लोकलमधील बिघाड - २३
- लोकल डब्यातील आपत्कालिन साखळी ओढणे - १९४ घटना
- प्राणी रुळ ओलांडताना होणारे अपघात - १०९
- मेल, एक्स्प्रेस इंजिनात बिघाड – ५८