
विविध नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना मुंबई पोलिसांकडून दिल्या जातात; मात्र अनेक वेळेस या सूचनांना विशेषतः वाहनचालकांकडून केराची टोपली दाखवण्यात येते. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तरुणाईमध्ये क्रेझ असलेल्या ‘दिस इज मी, दिस इज यू’ या गाण्यावर आधारित दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याबाबत जनजागृती करणारी रील पोस्ट केली आहे.
या रीलद्वारे पोलिसांनी दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांच्या या व्हिडीओला अवघ्या काही तासांत जवळपास ४५ हजार लाईक्स आणि ४००हून अधिक कमेंट्स नागरिकांकडून देण्यात आल्या. मुंबईसह अन्य शहरात वाहतुकीसंदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये दुचाकीवर बसणाऱ्या दोन्ही प्रवाशांना हेल्मेट घालणे सक्तीचे केले आहे; मात्र वाहनचालकांकडून अद्याप नियमांचे पालन होताना दिसत नाही. दरम्यान, या नियमाचे पालन सर्व दुचाकीस्वारांनी करावे, असे आवाहन विविध माध्यमातून मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.