मुंबईत पावसाची दमदार इनिंग! पुढील २४ तासांत जोरदार पावसाचा इशारा

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असून बुधवारी रात्रीनंतर पावसाने चांगलाच जोर धरला आणि...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असून बुधवारी रात्रीनंतर पावसाने चांगलाच जोर धरला आणि गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अधूनमधून जोरदार सरी बरसल्या. मुंबईत बरसलेल्या पावसाने उपनगरात वरुणराजाने सर्वाधिक बॅटिंग केली. बुधवारी रात्रीनंतर बरसलेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. दहिसर पूर्व येथील आर. एम. एस. हाऊसिंग सोसायटी परिसरात ४० वर्ष जुने पिंपळाचे मोठे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. दरम्यान, पुढील २४ तासांत शहर व उपनगरांत आकाश अंशत: ढगाळ राहणार असून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मुंबईत मान्सूनने रविवारी ९ जूनला पहिल्याच दिवशी दमदार आगमन केल्यानंतर मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. दोन दिवसांपासून पावसाने रिपरिप करत पुन्हा सुरुवात केली, मात्र पावसाचा जोर दिसत नव्हता. त्यामुळे दमदार पावसाची मुंबईकरांना प्रतीक्षा होती. हवामान विभागाने १९ जूननंतर पाऊस सक्रिय होऊन जोरदार कोसळेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार बुधवारी रात्रीनंतर पावसाने जोर धरला आणि गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत शहर व दोन्ही उपनगरात अधूनमधून जोरदार बरसला. चेंबूर, वाशीनाका, मानखुर्द, गोवंडी, टिळक नगर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, दादर आदी भागात सकाळी पावसाने चांगलीच बॅटिंग केली. दुपारी १२ नंतर मात्र पावसाने उघडीप केली.

दरम्यान, वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी सायंकाळी चौपाट्या, समुद्रकिनाऱ्यांवर अनेकांनी गर्दी केली होती. दरम्यान, पावसाने जोर धरत सक्रिय झाल्याने उन्हाच्या काहिलीने घामाघूम झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

पावसाची नोंद

शहर १.७६ मिमी

पूर्व उपनगर १२.४६ मिमी

पश्चिम उपनगर ७.७५ मिमी

येथे झाडे पडली

शहरात १, पश्चिम उपनगरांत १० व पूर्व उपनगरांत ४ अशा एकूण १५ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्या. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही

घरे व घरांच्या भिंती कोसळल्या

पश्चिम उपनगरांत १ व पूर्व उपनगरांत १ अशा दोन ठिकाणी घरे व घरांचा भाग कोसळला.

दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान

पश्चिम उपनगरांत सर्वाधिक पाऊस कोसळला. दहिसर पूर्व येथील आर. एम. एस. हाऊसिंग सोसायटी परिसरात ४० वर्षे जुने पिंपळाचे मोठे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन बाईक, तीन कार दबल्याची घटना घडली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

logo
marathi.freepressjournal.in