पाणीटंचाईच्या समस्येपासुन मुंबईकर होणार मुक्त

 पाणीटंचाईच्या समस्येपासुन मुंबईकर होणार मुक्त

एकीकडे महाराष्ट्रातील पाणीटंचाईची समस्या गंभीर होत असताना मुंबईकरांना मात्र यापासून मुक्तता मिळणार आहे. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या तलावांमध्ये २१.९९ टक्के साठा आहे. हा साठा जुलैपर्यंत पुरेल. त्यामुळे पाणी टंचाईची भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

ग्रामिण भागात पावसाळा संपल्यानंतर पाणी मिळण्याच्या अडचणी सुरू होतात. उन्हाळ्यात तर काही किलोमीटर पर्यंत वणवण करून पाणी आणावे लागते. येणार्‍या टँकरसाठी देखील एक- दोन किमीच्या रांगा लावल्या तरी पाणी मिळत नाही. मात्र या बाबतीत मुंबईकर काहीसा सुखी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सातही तलावांमध्ये पाणी साठा शिल्लक असतो. दरवर्षी १० ते १५ टक्के पाणी कपात होते मात्र तरी देखील पाण्याच्या बाबतीत मोठा असा फटका मुंबईकरांना बसत नाही.

यंदा मात्र दरवर्षीच्या तुलनेतही परिस्थीती उत्तम आहे. यंदा मुंबईच्या तलावांमध्ये जुलै मध्यापर्यंत पाणी पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबई शहराला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे महिना सरासरी १ लाख १५ हजार ते १ लाख १९ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासते. तलावातील पाण्याचा साठा लक्षात घेता, हे पाणी जुलै मध्यापर्यंत पुरेल इतके आहे. त्यामुळे शहरात सध्या तरी पाणीकपात करावी लागणार नसल्याचे जल अभियंता विभागातील एका वरिष्ठ अभियंत्याने स्पष्ट केले.

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

मोडकसागर तलाव - ४३,८१३

तानसा तलाव - २२,१८८

मध्य वैतरणा तलाव- ८२,१०४

भातसा तलाव - १,६१,९००

विहार तलाव - ५,४६६

तुळशी तलाव - २,७९७

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in