
बोरिवली येथील मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन क्लबतर्फे आयोजित ७व्या राज्य मानांकन स्पर्धेत मुंबईचा विश्वविजेता प्रशांत मोरे आणि रत्नागिरीची किशोरवयीन आकांक्षा कदम यांनी जेतेपद पटकावले. एप्रिल महिन्यात या दोघांनीच शिवाजी पार्क येथे झालेल्या स्पर्धेतही जेतेपदावर नाव कोरले होते.
पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रशांतने पुण्याच्या योगेश परदेशीवर २५-१६, १६-१९, २५-९ अशी तीन सेटमध्ये मात केली. महिलांच्या अंतिम फेरीत आकांक्षाने मुंबईच्या मिताली पाठकवर २२-१३, १५-१७, १६-१० असा तीन सेटमध्ये विजय मिळवला. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात पुरुषांमध्ये मुंबईच्या विकास धारियाने मुंबईच्याच योगेश धोंगडेला १०-१६, २३-२१, २३-१० असे पिछाडीवरून नमवले. तर महिलांमध्ये मुंबईच्या काजल कुमारीने पुण्याच्या पुष्कर्णी भट्टडवर २३-७, २५-६ असे सरळ दोन सेटमध्ये वर्चस्व गाजवले.