चांदिवली, अंधेरीतील पदपथ फेरीवालामुक्त फेरीवाल्यांविरोधात पालिकेची कारवाई

मुंबईतील रस्ते, पदपथ हे फेरीवाल्यांपासून मुक्त रहावेत, त्यावर अत‍िक्रमण होवू नये
चांदिवली, अंधेरीतील पदपथ फेरीवालामुक्त फेरीवाल्यांविरोधात पालिकेची कारवाई

मुंबई : पदपथावर रस्ते अडवून बसणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. अंधेरी पश्चिम व कुर्ला पश्चिम येथील बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने केलेल्या कारवाईमुळे येथील पदपथ फेरीवाला मुक्त झाल्याने नागरिकांना ये जा करण्यासाठी मोकळा रस्ता मिळाला आहे.

अंधेरी पश्चिम व कुर्ला पश्चिम एल वॉर्ड परिसरात अनधिकृतपणे अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेच्या अत‍िक्रमण विभागाने कारवाई केली. रस्ते वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना पालिकेकडून दंड ठोठावण्यात आला. तसेच कारवाई झालेल्या जागी पुन्हा अत‍िक्रमण होवू नये म्हणून या पर‍िसरावर अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून सतत पाळत ठेवली जाणार आहे. या कारवाईमुळे चांदिवली येथील नाहर इस्टेट, डी मार्ट, तसेच मुंबई अग्न‍िशमन उप केंद्रालगतचा पर‍िसर अत‍िक्रमणमुक्त झाला आहे. तसेच के पश्चिम व‍िभागा‍त जे. पी. मार्ग, अंधेरी (पश्चिम) या परिसरातही अत‍िक्रमणावर कारवाई करण्यात आली अशी माहिती पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली.

मुंबईतील रस्ते, पदपथ हे फेरीवाल्यांपासून मुक्त रहावेत, त्यावर अत‍िक्रमण होवू नये, पादचाऱ्यांना चालणे सोयीचे व्हावे, यासाठी फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने नाहर इस्टेट, डीमार्ट, तसेच मुंबई अग्न‍िशमन उपकेंद्रालगतचे खाद्यपदार्थ व‍िक्रेते, अनधिकृत फेरीवाल्यांवर शनिवारी धडक कारवाई केली. अत‍िक्रमण निर्मूलन कारवाई सुरू होताच फेरीवाल्यांचे प्रतिनिधी महानगरपालिकेच्या वाहनाचा पाठलाग करुन त्यांची माहिती पुढील पर‍िसरात बसलेल्या फेरीवाल्यांना पुरव‍ित होते. हे निदर्शनास येताच अत‍िक्रमण पथकाने त्या व्यक्तींना चकवा देत कारवाई केली. या पथकाने अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करुन फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केले आहे. वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) उपविभागातील अनुज्ञापन निरीक्षक मनीषा हांडे, जॉन्सन, राजेश गवई, मन्सूर सय्यद व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

के पश्चिम व‍िभागात अंधेरी (पश्चिम) येथील जे. पी. मार्ग येथील परिसरात कारवाई करण्यात आली. या विभागात जे. पी. मार्ग परिसरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते व इतर मिळून एकूण ६८ अनधिकृत फेरीवाल्‍यांवर कारवाई करून हा परिसर अनधिकृत फेरीवाला मुक्‍त करण्‍यात आला. तसेच संबंधित ठिकाणी पुन्हा अत‍िक्रमण होवू नये यासाठी पथकाचा नियमित वॉच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in