
वाहतुकीसाठी स्मूथ, मजबूत रस्ते मुंबईकरांना मिळावेत, यासाठी तब्बल ५०० नवीन रस्ते तयार करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. नवीन रस्त्यांसाठी तब्बल २,२१०.९ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. तर सध्यस्थितीत २९५ रस्त्यांची कामे सुरु असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे. दरम्यान, २१० रस्त्यांची कामे पुढील दोन वर्षांत पूर्ण होतील, असे ही ते म्हणाले.
मुंबई महापालिकेच्या अखत्यारित दोन हजार किलोमीटरचे रस्ते असून रस्त्यांची देखभाल दुरुस्ती कंत्राटदार व मध्यवर्ती विभागाच्या माध्यमातून केली जातात. मुंबईकरांना दर्जेदार व टिकाऊ रस्ते मिळावे यासाठी ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत, त्या ठिकाणच्या कामाचे लाईव्ह प्रक्षेपण रस्ते विभागातील अधिकाऱ्यांना दाखवणे कंत्राटदारांना बंधनकारक आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे रस्ते कामाचा दर्जा राखला जातो का याची माहिती वेळोवेळी घेत काही कुचराई आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करणे शक्य होणार आहे. तसेच डांबराचे रस्ते पावसाळ्यात उखडले जात असल्याने यापुढे सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे दोन हजार किलोमीटरच्या रस्त्यांपैकी एक हजार किलोमीटरचे रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.
असे नियोजन
- शहर विभाग - २२४ रस्ते, काम सुरू - ६८
- पूर्व उपनगर - १४२ रस्ते, काम सुरू - ८०
- पश्चिम उपनगर - २०८ रस्ते, काम सुरू - १४७