
राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पक्षाने त्यांची निवड परिषदेतील गटनेतेपदासाठी केली आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या प्रतोतपदी अनिकेत तटकरेंची निवड करण्यात आली. याबाबत राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र दिले होते. एकनाथ खडसेंना अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जळगावमध्ये नेते एकनाथ खडसेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीला अधिक बळ मिळून पुढच्या निवडणुकीसाठी याचा मोठा फायदा होऊ शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेले एकनाथ खडसे हे त्यानंतर विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आता पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. दरम्यान, जळगावमध्ये भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे अनेकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे.