
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला होता. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाणदेखील केली होती. यासंबंधित काही व्हिडियो सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले होते.
ठाणे वर्तक नगर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सांगितले की, "मुंबईकडे जायला निघालेलो असताना पोलिसांच्या फोननंतर मी स्वत: वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालो. पोलिस निरीक्षकांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. तोपर्यंत डीसीपी राठोड पोलीस स्टेशनमध्ये आले अन् त्यांनी मला ताब्यात घेतलं.
हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडणे, जमावबंदी नियम तोडणे, प्रेक्षकांना मारहाण करणे, अशा विविध कारणांवरून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. याच प्रकरणी आज जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.