
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आता भाजपसह अनेक हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. आधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 'छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर स्वराज्यरक्षक होते' असे वादग्रस्त वक्तव्य विधानसभेत केले. तर, त्यांची पाठराखण करताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाचे गुणगान गायले. यानंतर भाजप राज्यभर आक्रमक झाले असून दोघांनीही हिंदूंची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी भाजपने मुंबईतील दादरमध्ये जोरदार आंदोलन केले.
दादर स्थानकाजवळ भाजपने आंदोलन केले. यावेळी अजित पवार यांचे पोस्टर हातात घेऊन त्यांच्या विरोधात घोणबाजी केली. अजित पवारांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. याआधी हिंगोली, पुणे, नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलने केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत, 'छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर स्वराज्यरक्षक होते' असे विधान केले. यानंतर त्यांचे समर्थन करताना जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाचे गुणगान गायले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडून बहादुरगडावर नेले. तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचे मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदुद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचे मंदिरही फोडले असते," असे वादग्रस्त वक्तव्य आव्हाड यांनी यावेळी केले.