मुंबई : नगर आणि नाशिक जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे जलपूजन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र, या कार्यक्रमात निळवंडेसाठी योगदान देणारे कुणीही हजर नव्हते. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी तर हा विषय प्रतिष्ठेचा बनवून पाठपुरावा केला होता. त्यांनादेखील बोलावले नाही. अकोलेच्या आमदारांनाही डावलले गेले. एवढेच काय तर प्रकल्पग्रस्त किंवा साधा कामगारदेखील नव्हता. मात्र, ज्यांचे योगदानच नाही, ते मात्र याचे सर्व श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत होते, अशा शब्दांत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यामुळे निळवंडेच्या श्रेयवादावरून पुन्हा राजकीय लढाई सुरू झाली.
निळवंडे धरणाच्या पाण्याच्या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन नगर जिल्ह्यात श्रेयवाद सुरू आहे. विखे-पाटील यांनी हा विषय प्रतिष्ठेचा बनवून या धरणाच्या जलपूजनासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले आणि या माध्यमातून याचे सर्व श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. परंतु यावर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी वडगावपान (ता. संगमनेर) येथे आयोजित कृतज्ञता सोहळा व जलपूजन कार्यक्रमात विखेंवर हल्लाबोल केला.
दुष्काळी भागातील जनतेला निळवंडे धरणाचे पाणी मिळावे, यासाठी आपण काम केले. धरणग्रस्तांना संगमनेर तालुक्यात जमिनी दिल्या. सहकारी संस्थांमध्ये नोकऱ्या दिल्या. प्रत्येक टप्प्यावर निधी मिळवून दिला. या कामात ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची मदत झाली. खरे तर उन्हाळ्यात निळवंडे धरणात १० टीएमसी पाणी होते. त्यावेळी दुष्काळी गावांमधील सर्व बंधारे भरून घेता आले असते. मात्र, श्रेयासाठी पाणी सोडणे थांबवले, हे जनतेला ज्ञात आहे. निळवंडेच्या पाण्यामुळे तालुक्यात आनंदाची दिवाळी होत आहे. पुढील काळात हे पाणी सर्वांना मिळेल. यासाठीच काम केले जाईल, असे थोरात म्हणाले. विखेंचे नाव न घेता तुम्ही इकडे येता ते तालुक्यातील विकासकामे थांबवण्यासाठी. आम्ही राहाता तालुक्यात जातो, ते चांगले करण्यासाठी, असा टोलाही त्यांनी लगावला.
विखेंची कोंडी करणार?
गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांना बळ देण्याचे काम केले आहे. कारण त्यावेळी त्यांच्यासोबत युती करून कारखाना निवडणुकीत विखेच्या पॅनलचा धुव्वा उडविला. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीतही विवेक कोल्हे यांनी विखेंच्या पॅनलच्या चारीमुंड्या चीत केल्या. त्यामुळे विवेक कोल्हे यांचे बळ वाढले असून, ते विखेंविरोधात आक्रमक पवित्रा घेत आहेत. या माध्यमातून थोरात आगामी काळात विखेंना घेरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.