सायन कोळीवाडातील रहीवाशांना मुंबई महापालिकेच्या नोटीसा

सायन कोळीवाडातील रहीवाशांना मुंबई महापालिकेच्या नोटीसा

मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या भूमिपुत्रांना मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव रचला जात आहे. सायन कोळीवाडा पीव्हीआर सिनेमाजवळ ब्रिटिशकालीन बैठ्या चाळी असून, मुंबईचे भूमिपुत्र कोळी बांधव वर्षानुवर्षे या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. एसआरए प्रकल्पाचा काहीही संबंध नसताना एसआरए अंतर्गत बांधकाम करण्याचा घाट घातला जात आहे. विकासकाला फायदा मिळावा, यासाठी ही उठाठेव सुरू असल्याचा आरोप रहिवासी राजेश केणी यांनी केला आहे. दरम्यान, घर खाली करण्यासाठी मुंबई महापालिकेने नोटीस बजावली असून कोळी बांधवांमध्ये याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. वांद्रे पूर्व कलानगरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बेहराम पाडा, भारत नगर या ठिकाणी बेकायदा बांधकाम होत असून चार ते पाच मजली बांधकाम केले जात आहे. मुंबईत बेकायदा बांधकामे होत असून ती जमीनदोस्त न करता मूळ मुंबईकर असलेल्या कोळी बांधवांना मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव आहे, असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. सायन कोळीवाडा पीव्हीआर सिनेमाजवळ बैठी चाळ असून, १०० ते १५० वर्षांपूर्वीची चाळ आहेत. या चाळीत १५ कुटुंब राहत असून ही चाळ एसआरए प्रकल्पात मोडत नसताना फक्त अन् फक्त विकासकाला फायदा मिळावा यासाठी मुंबई महापालिकेचा खटाटोप सुरू आहे. पालिकेच्या एफ उत्तर विभागाने आठ दिवसांपूर्वी नोटीस बजावली असून, २४ मेपर्यंत घर खाली करण्यास सांगितले आहे. घर खाली केले नाही तर पोलीस बंदोबस्तात घर जमीनदोस्त करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in