गणेशोत्सवानिमित्त अवघ्या काही दिवसांतच रेल्वे, एसटी बसचे आरक्षण पूर्ण

परतीच्या प्रवासाचे तिकीट मिळविण्यासाठीदेखील प्रवाशांची धावपळ सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे
गणेशोत्सवानिमित्त अवघ्या काही दिवसांतच रेल्वे, एसटी बसचे आरक्षण पूर्ण

गणेशोत्सवनिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. रेल्वे, एसटी बसने कोकणाकडे जाण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे आणि एसटी प्रशासनाकडून ३ ते ४ महिने आधीच आरक्षण सुरू करण्यात आले. यानंतर अवघ्या काही दिवसांतच आरक्षण पूर्ण झाले असून, त्यानंतर सोडण्यात येणाऱ्या जादा अतिरिक्त गाड्यांचे बुकिंगदेखील फूल झाल्याचे दर्शवत आहे. परतीच्या प्रवासाच्या आरक्षणाचीही हीच स्थिती असून परतीच्या प्रवासाचे तिकीट मिळविण्यासाठीदेखील प्रवाशांची धावपळ सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण अधिक आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने या उत्सवासाठी ७४ विशेष गाड्या आणि त्यांनतर आणखी काही गाड्यांचे नियोजन केले आहे. याशिवाय रोहा आणि चिपळूण दरम्यान गणपती उत्सवासाठी ३२ मेमू सेवादेखील सोडण्यात येणार आहेत. एप्रिल महिन्यापासून या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला २५०० जादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे; मात्र कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांबरोबरच विशेष रेल्वे गाड्यांनाही गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षायादी आहे. काही गाड्यांच्या श्रेणींच्या प्रतीक्षायादीचे तिकीट देणेही बंद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in