
राज्यातील विविध जिल्ह्यात कांद्याच्या दरांत प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला किरकोळ बाजारात ३० रुपये किलोप्रमाणे विक्री होणारा कांदा आता १० ते १५ रुपये किलोवर आला आहे. कांदादरातील घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असताना दुसऱ्या बाजूला शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मागील दोन-तीन दिवसांपासून कांदादरात घसरण होत असून सोमवारी कांदा १० ते १५ रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री होत असल्याचे कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्रासह गुजरात आणि इतर राज्यातीलही उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे; मात्र उत्पन्नाच्या तुलनेत कांद्याची मागणी घटल्याने दिवसागणिक कांद्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच अलीकडे राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरील करकपात करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र मालवाहतूक खर्च आणि उत्पादन खर्च मिळणाऱ्या तुटपुंज्या रकमेतून भागत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, पावसाळा आल्याने बाजारात दाखल होत असलेला माल वेळीच संपला नाही, तर आणखी दरात घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त हाेत आहे.