मशीन वाटपाच्या आयोजनावर केवळ १.९४ कोटींची उधळपट्टी

२० हजारांहून अधिक मशीनचे वाटप - प्राची जांभेकर
मशीन वाटपाच्या आयोजनावर केवळ १.९४ कोटींची उधळपट्टी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे शिलाई मशीन, घरघंटी मशीन आणि मसाला कांडप मशीन वाटप योजनेचा शुभारंभ चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात नुकताच संपन्न झाला होता. या आयोजनावर मुंबई महानगरपालिकेने केवळ १.९४ कोटी खर्च केले, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेच्या एफ. उत्तर वॉर्ड कार्यालयाने दिली आहे.

दरम्यान, १३ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिलाई मशीन, मसाला कांडप, घरघंटी वापट कार्यक्रम पार पडला. १३ मे ते आतापर्यंत २० हजारांहून अधिक मशीनचे वाटप करण्यात आल्याचे पालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालक प्राची जांभेकर यांनी सांगितले. तर मसाला कांडप मशीन वेळीच उपलब्ध न झाल्याने काहीसा उशीर झाला असून लवकरच त्या मशीनचे वाटप करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

शिलाई मशीन, घरघंटी मशीन आणि मसाला कांडप मशीन वाटपाच्या कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या खर्चाची माहिती गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत मागितली होती. महानगरपालिकेच्या एफ. उत्तर वॉर्ड कार्यालयाने गलगली यांस कळविले की, चुनाभट्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिलाई मशीन, घरघंटी मशीन आणि मसाला कांडप मशीन वाटपाच्या कार्यक्रमासाठी कंत्राटदार मे. जेस आयडियाज प्रायव्हेट लिमिटेड (मंडप, स्टेज, टेबल, खुर्च्या, कारपेट, पाणी, अल्पोपहार, इत्यादी कामासाठी) व मे. एस बी इंटरप्रायझेस (एलईडी लाइट, प्रकाशयोजना, ध्वनी यंत्रणा, जनरेटर फॅन, कूलर, फोटो शूटिंग, व्हिडियो, इत्यादी कामासाठी) यांना नियुक्त करण्यात आलेले होते. या कामासाठी निधी उपलब्ध झाला नसल्याने कंत्राटदार यांना आतापर्यंत कामाचे अधिदान करणे बाकी आहे. या कार्यक्रमासाठी एकूण १ कोटी ९३ लाख ७६ हजार ५०० रुपये इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे.

खर्चाची चौकशी करा !

या आयोजनाचा खर्च अवाढव्य असून याची चौकशी करणे आवश्यक असल्याचे गलगली यांनी नमूद केले आहे. कारण महापालिकेकडून अशा मशीनचे प्रभाग स्तरावर कोणताही खर्च न करता मोफत वाटप करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in