दोघेच मंत्रिमंडळ बैठक घेणार, उरलेल्‍या ४५ खुर्च्या त्‍यांच्याकडे बघत बसणार; विरोधी पक्षनेतेअजित पवार यांची टीका

“विदर्भ, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर गोगलगायीच्या आक्रमणामुळे काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
दोघेच मंत्रिमंडळ बैठक घेणार, उरलेल्‍या ४५ खुर्च्या त्‍यांच्याकडे बघत बसणार; विरोधी पक्षनेतेअजित पवार यांची टीका

आता नवीन सरकार येऊन एक महिना उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्‍तार नाही. उद्या मंत्रिमंडळ बैठक आहे. दोघेच मंत्रिमंडळ बैठक घेणार. उरलेल्‍या ४५ खुर्च्या त्‍यांच्याकडे बघत बसणार. यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही की, त्यांच्याकडे आमदार संख्या वाढल्याने होत नाही,” असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला. विदर्भ-मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना नुकसानीची तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणीही त्‍यांनी केली. शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना उद्या पत्र देणार असल्याचेही ते म्हणाले.

“विदर्भ, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर गोगलगायीच्या आक्रमणामुळे काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दौरा केला; परंतु त्यांनी केंद्र सरकारला अद्याप कळवले नाही, असे दिसते. त्यामुळे केंद्राची टीम पाहणी करायला आलेली नाही,” असेही अजित पवार म्हणाले. “विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे १० लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आता खरीप हंगाम गेला आहे. पुढे रब्बी हंगाम येईल. त्यामुळे कृषी विभाग व सरकारने यामध्ये हस्तक्षेप करायला हवा. अतिवृष्टीग्रस्त भागातील काही ठिकाणी पंचनामे केलेले नाहीत. या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळायला हवी; मात्र काही ठिकाणी मनुष्यहानी झाली, तिथे चार लाखांची मदत मिळाली आहे. ती मदत तुटपुंजी आहे. त्यात वाढ व्हायला हवी. पशुधनाची भरपाई मिळालेली नाही. ती तत्काळ मिळायला हवी. त्यांना उभे करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. तिकडे लक्ष दिला पाहिजे,” असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

‘‘एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार नाही. त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही की, त्यांच्याकडे आमदार संख्या वाढल्याने अडचण होतेय,’’ असा चिमटाही अजित पवार यांनी काढला. “मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्याचे अधिकार आहेत. उपमुख्यमंत्री यांना खातेच दिलेले नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे जात आहे; मात्र सहीअभावी फायली थांबल्या आहेत.

सह्या करायला मुख्यमंत्र्यांना वेळच नाही. जनतेची कामे झाली पाहिजेत, हीच आमची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री मिरवणुका, सत्कार, सभा घेत आहेत. आता तर रात्रीच्याही सभा घेत आहेत. राज्याचा प्रमुखच नियम तोडत असेल तर पोलीस अधीक्षक काय करणार,” असा उद्विग्न सवालही अजित पवार यांनी केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in