रक्तदान शिबिरे आयोजित करा

समन्वय समितीचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन
रक्तदान शिबिरे आयोजित करा

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करत, समाजोपयोगी कार्यही पार पाडणे गरजेचे आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असून गरजूंना वेळीच रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. तसेच सामाजिक व आरोग्यदायी उपक्रम राबवावे, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केल्याचे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

मुंबई व उपनगरात १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. गेली कित्येक वर्षे मुंबई व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे हा उत्सव फक्त १० दिवसांसाठी मर्यादित न ठेवता वर्षभर समाजासाठी सामाजिक उपक्रम, अनेक प्रकारची शिबिरे (रक्तदान, नेत्रदान, अवयवदान, आरोग्य चिकित्सा, मोफत शारीरिक चाचणी, इत्यादी) तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्थानिक गुणवंत आणि होतकरू कलाकारांना एक खुले व्यासपीठ उपलब्ध करून देतात. तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी कलाकौशल्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. यंदाच्या वर्षीही बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या आवाहनानुसार अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे. यंदा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून आपल्या विभागात रक्तदान शिबिरे आयोजित करून स्थानिकांमध्ये जनजागृती करून रकदात्यांना रक्तदान करण्यासाठी जनजागृती करावी. पालिकेच्या सहाय्यक आयुक्त व आरोग्य विभागाला असे सामाजिक व आरोग्यच्या उपक्रम आयोजित करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून संबंधितानी अनुकूल असल्याचे दहिबावकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in