एकनाथ शिंदे यांच्या विरोधात राज्यात उद्रेक सुरूच

एकनाथ शिंदे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा शववाहिकेमधून काढण्यात आली
एकनाथ शिंदे यांच्या विरोधात राज्यात उद्रेक सुरूच
ANI

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोमवारीही राज्यात ठिकठिकाणी उद्रेक सुरूच होता. पुण्यात व जयसिंगपूरमध्ये सोमवारी विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

यादरम्यान टिंबर मार्केट ते रामोशी गेटपर्यंत पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा शववाहिकेमधून काढण्यात आली. या शववाहिकेवर ‘बंडखोर आमदार पंगतीतले कावळे, बंडखोर आमदार डोम कावळे’ हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच यावेळी एकनाथ शिंदेंविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यापूर्वी, आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील बालाजीनगर येथील मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडच्या ऑफिसची शिवसैनिकांनी तोडफोड केली होती.

शिवसैनिक आणि राजेंद्र पाटील यड्रावकर समर्थकांमध्ये हाणामारी

जयसिंगपूरमधील बंडखोर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याविरुद्ध सोमवारी शिवसैनिक रस्त्यावर उतरले; मात्र नेमके त्याच वेळेस यड्रावकरांचे समर्थकही तिथे आल्यामुळे यड्रावकर समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाली.

पोलीस आणि शिवसैनिकांमध्येही झटापट

जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे समर्थक त्यांना पाठिंबा देण्यासाठी यड्रावकरांच्या कार्यालयाबाहेर एकत्र आले होते; मात्र शिवसैनिकही नेमके त्याच वेळेस मोर्चा घेऊन यड्रावकरांच्या कार्यालयाजवळ आले. यड्रावकर समर्थक आणि शिवसैनिक आमने-सामने आल्यामुळे दोघांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर शिवसैनिक आणि पोलिसांमध्येही झटापट झाल्याचे दिसून आले. दोन्ही गटांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता; मात्र त्यानंतरही दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in