या वर्षी हिवतापाचा प्रादुर्भाव जास्त असण्याची शक्यता

कोरोना साथीच्या काळात सर्व आरोग्य यंत्रणा कोरोना नियंत्रणात गुंतल्यामुळे हिवताप नियंत्रणावर दुर्लक्ष झाले.
या वर्षी हिवतापाचा प्रादुर्भाव जास्त असण्याची शक्यता

एकीकडे राज्यभरात कोरोनाची चौथी लाट ऐन भरात असताना दुसरीकडे हिवतापाच्या रुग्णांमध्ये काही अंशी वाढ झाली आहे. नियमित पावसाळा सुरू होण्याआधीच ८ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यभरात ३ हजार ५८० रुग्णांना हिवतापाची लागण झाली असून दोन वर्षांप्रमाणे या वर्षीही हिवतापाचा प्रादुर्भाव जास्त असण्याची शक्यता आहे.

कोरोना साथीच्या काळात सर्व आरोग्य यंत्रणा कोरोना नियंत्रणात गुंतल्यामुळे हिवताप नियंत्रणावर दुर्लक्ष झाले. परिणामी २०२०मध्ये हिवतापाच्या रुग्णांमध्ये जवळपास तिपटीने वाढ झाली आणि रुग्णसंख्या ४ हजार ७१ वरून १२ हजार ९०९ वर गेली. २०२१ मध्ये यातील वाढ कायम राहिली असून १९ हजार ३०४ रुग्ण नोंदवले गेले. मृतांच्या संख्येतही या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले. २०१९ मध्ये हिवतापामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. परंतु २०२० आणि २०२१ मध्ये हे प्रमाण अनुक्रमे १२ आणि १४वर पोहोचले.

यंदा १ जानेवारी ते ८ जून या काळातच रुग्णसंख्या ३ हजार ५८०वर गेली आहे. तसेच तीन मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांत राज्यभरात अधूनमधून पडणाऱ्या पावसांच्या सरीमुळे हिवतापाचा प्रादुर्भाव संथ गतीने वाढला आहे. २०१९ च्या तुलनेत पावसाळ्यापूर्वीच रुग्णसंख्या साडे तीन हजारांच्या घरात गेली आहे. पावसाळा सुरू झाल्यावर आणखी वाढ होईल. त्यामुळे यंदाही हिवतापाचा प्रादुर्भाव २०२० आणि २०२१ इतक्याच जास्त प्रमाणात राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in