
नवी मुंबईसारख्या स्मार्ट शहरात असलेल्या खाऊगल्ली, हॉटेल, कॅफे, स्नॅक्स कॉर्नर या ठिकाणी खवय्यांची कायम रेलचेल असते. स्वच्छ खाद्यपुरवठा ग्राहकांना पुरवणे, ही विक्रेत्यांची प्राथमिक जबाबदारी असताना वाशी (Vashi) रेल्वे स्थानकातील सार्वजनिक शौचालयात पाणीपुरी व त्याचे सामान ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार २३ डिसेंबर रोजी उघडकीस आला. एका जागरूक नागरिकाने हा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर आणला असून सोशल मीडियावर याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच तात्काळ अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वाशी रेल्वे स्थानकाबाहेर आलिशान मॉल्स, खाऊगल्ली तसेच लहान-मोठे ढाबे, हॉटेल्स आहेत. आजूबाजूला असणाऱ्या खासगी कार्यालयातून येणारे कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्यने या ठिकाणी येतात. स्थानकाबाहेर फुटपाथवर सँडविच, पाणीपुरी, भेळ, ज्युस विक्रेत्यांजवळ देखील नागरिकांची मोठी गर्दी असते. जागेअभावी लहान खाद्य विक्रेत्यांकडून आपले सामान स्थानक परिसरात ठेवण्यात येते. मात्र शुक्रवार २३ डिसेंबर रोजी एका पाणीपुरी विक्रेत्याने चक्क आपले सामान वाशी स्थानकातील सार्वजनिक शौचालयात एका बाजूला ठेवल्याचे निदर्शनास आले.
शौचालयास गेलेल्या एका नागरिकाने हे पाहताच त्याने संबंधित घटनेचा विडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट करत "पाणीपुरीचे सामान ठेवण्याची ही कोणती जागा? अशी पाणीपुरी आपण खाऊन आरोग्य खराब करणार का? रेल्वे प्रशासन, सफाई कर्मचाऱ्यांनी याची अडवणूक का केली नाही?" असे प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून विचारले आहेत. दरम्यान, हा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर आपला माल ठेवण्यास तिथे कोणतीही सोय नसल्याने हे खाद्यविक्रेते तेथील शौचालयाचा वापर करत असल्याची माहिती समोर आली असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.