माहीम येथे धोकादायक इमारतीचा भाग कोसळला शेजारील इमारत, बैठ्या चाळीतील रहिवासी बचावले

१५० हून अधिक रहिवाशांचे स्थलांतर ; सुरक्षेच्या कारणास्तव रस्ता बंद
माहीम येथे धोकादायक इमारतीचा भाग कोसळला शेजारील इमारत, बैठ्या चाळीतील रहिवासी बचावले

मुंबई : माहिम पश्चिम येथील अतिधोकादायक हाजी कासीम इस्माईल इमारतीचा काही भाग बुधवारी सायंकाळी कोसळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी इमारत अतिधोकादायक स्थितीत असल्याने या इमारतीतील, शेजारील इमारतीतील व बैठ्या घरातील १५० हून अधिक रहिवाशांना जवळील पालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आल्याने रहिवासी थोडक्यात बचावले. सुरक्षेच्या कारणास्तव इमारत परिसरातील रस्ता बंद करण्यात आल्याचे पालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले.

माहिम पश्चिम एम एम छोटानी ३ रा छेद मार्ग येथे म्हाडाची उपकर प्राप्त तळ अधिक तीन मजली जुनी इमारत आहे. ही इमारत अतिधोकादायक स्थितीत असून म्हाडाच्या अखत्यारीत येते. बुधवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास इमारतीचा काही भाग रस्त्यावर कोसळला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले; मात्र या इमारतीत, इमारतीला लागून दोन विंग असून, इमारतीच्या बाजूला बैठी घरे आहे. इमारतीचा भाग कोसळल्याने उर्वरित भाग कधीही कोसळण्याची शक्यता आहे. तसेच इमारत पूर्णतः अतिधोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे हाजी कासिम इस्माईल इमारत, शेजारील इमारत व बैठ्या घरात १५० रहिवासी राहतात. परंतु हाजी कासिम इस्माईल इमारत कधीही कोसळण्याचा धोका लक्षात घेता १५० रहिवाशांना जवळील पालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच इमारत धोकादायक झाल्याने परिसर बॅरेकेट्स लावून बंद करण्यात आला आहे. तसेच इमारत परिसरातील रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आल्याचे सपकाळे यांनी सांगितले.

दरम्यान, म्हाडाची उपकर प्राप्त इमारत असून, सुरक्षेसाठी इमारतीला टेकू लावण्यात येईल, असे म्हाडाकडून सांगण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in