
डोंबिवली शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यांना रेबिजची लागण होण्याची शक्यता आहे. याचा मानवी आरोग्यालाही धोका संभवतो. ‘पॉज’तर्फे दरवर्षी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रेबीज लसीकरण मोहीम घेतली जाते. ठाणे जिल्ह्यातील शहरांसह उपनगरांत भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वूमीवर ‘पॉज’ने रेल्वे स्थानकांत कुत्र्यांची अनोखी लसीकरण मोहीम फत्ते केली.
रेबीज झालेला कुत्रा माणसाला चावल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे शहरी कुत्र्यांना अँटीरेबीज लस देण्याचा उपक्रम पॉजने मागील २१ वर्षांपासून सुरू केला आहे. विविध पालिकांकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. त्याचवेळी त्यांचे लसीकरण करण्यात येते. मात्र भटक्या कुत्र्यांचे लसीकरणच होत नसल्याने त्यांच्यासह परिसरातील सर्वसामान्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळेच ही विशेष रेबीजविरोधी मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. शनिवारी कोपर, डोंबिवली आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकांमधील सुमारे ३५ भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली.
कोपर, ठाकुर्ली आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक नीलेश भणगे यांनी दिली. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांसह इतर प्राण्यांना रेबीजसारख्या आजारांची लागण होते. यासाठी प्लॅन्ट ऍन्ड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी अर्थात पॉजने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. पॉज संस्थेचे 3 स्वयंसेवक आणि एक पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने विशेष लसीकरण मोहीम राबवल्याचे पॉजचे नीलेश भणगे यांनी सांगितले.
पुढील आठवड्यात ठाणे, कल्याणमध्ये मोहीम
पुढील टप्प्यामध्ये कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे येथेही ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे राज मारू यांनी सांगितले. रेल्वे स्थानक परिसरातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पॉजतर्फे त्यांचे लसीकरण येत्या आठवड्यात केले जाणार आहे.