
मुंबई : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमातील बसेसचा ताफा वाढण्यासाठी नवीन बसेस घेणे गरजेचे आहे. यासाठी नवीन बसेस घेण्यासाठी बेस्ट उपक्रमाला ५ हजार कोटी रुपयांचे अनुदान द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पालिका आयुक्तांची भेट घेतली, त्यानंतर त्या बोलत होत्या.
बेस्टमधील कामगार संघटना बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या सेवेत विलिनीकरण करा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. खासदार सुळे यांनी मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रम न ठेवता थेट पालिकेच्या सेवेमध्ये समाविष्ट करा, अशी मागणी आयुक्तांकडे केली. बेस्टचे खासगीकरण थांबवून तातडीने बेस्टची भरती आणि बढती सुरू करा, बेस्टला पालिकेने ५ हजार कोटी बिनव्याजी द्यावेत, त्या निधीतून नवीन बस खरेदी करण्याची सूचना बेस्ट प्रशासनाला कराव्यात, आदी मागण्या त्यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केल्या आहेत. तसेच बेस्टमध्ये कंत्राटी काम करणाऱ्या सर्व वाहक, चालक आणि इतर कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
कायम आणि कंत्राटी कामगारांना बोनस द्या
बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस देण्यात यावा, बेस्टचे कंत्राटी कामगार आणि कायमस्वरूपी कामगार समान काम करतात, परंतु त्यांचे वेतन अतिशय तुटपुंजे आहेत. त्यामुळे ‘समान काम, समान वेतन’ धोरण स्वीकारावे, ठेकेदार कामगारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे १ नोव्हेंबर २०२३ पासून २५००० रुपये वेतन देण्यात यावे आणि ऑगस्ट २०२३ पासूनची फरक रक्कम दिवाळीच्या बोनसमध्ये जोडून देण्यात यावी, कोरोनादरम्यान मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाद्वारे ठरलेली रक्कम तातडीने देण्यात यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या.