
मीरा भाईंदर महापालिकेने काही कोटी रुपये खर्चून मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेर सुशोभीकरण केले आहे. तसेच शहीद स्मारक उभारले आहे. परंतु महापालिकेच्या वरदहस्तामुळे या ठिकाणी फेरीवाल्यांचे सर्रास अतिक्रमण झाले आहे. न्यायालयाच्या आदेशालासुद्धा केराची टोपली दाखवत रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा कायम आहे. शहीद स्मारकाचा अवमान होत असल्याने लोक संतप्त आहेत.
रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या परिसरात फेरीवालयांना बसण्यास न्यायालयाची मनाई आहे. परंतु मीरारोड रेल्वे स्थानकास महापालिकेच्या वरदहस्तामुळे फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. या ठिकाणी महापालिकेने राजकारण्यांच्या आग्रहाने सुशोभीकरणाचे काँक्रिट बांधकाम काही कोटी रुपये खर्चून बांधले आहे. तसेच आवारातदेखील सुशोभीकरण करून मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मरणार्थ शहीद स्मारक उभारले आहे.
मीरारोड रेल्वे स्थानकात रोजचे हजारो प्रवासी ये-जा करत असून सकाळ व संध्याकाळी मोठी गर्दी असते. तसे असताना रेल्वे स्थानकात ये-जा करणाऱ्या मार्गांवरच फेरीवाल्यांचा गराडा पडलेला आहे. सुशोभीकरण केलेल्या बांधकामात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा कब्जा आहे. शहीद स्मारक परिसरातसुद्धा फेरीवाल्यांच्या हातगाड्या, बाकडे लागत आहेत.
फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे प्रवाशांना चालणे जिकिरीचे झाले असून आपत्कालीन प्रसंगी मोठा धोका होण्याची शक्यता आहे. कोट्यवधी रुपये खर्चून सुशोभिकरणाची केलेली कामे फेरीवाल्यांना बसवण्यासाठी केली का? असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे.