
गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi in Mumbai) यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 मार्गांचे उद्घाटन आणि इतर अनेक विकास कामांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. या विकासकामांचा उद्घाटन सोहळा मुंबईतील बीकेसी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो मार्गांच्या उद्घाटनासाठी अंधेरीतील गुंदवली मेट्रो स्टेशनकडे रवाना होतील. मात्र, त्यापूर्वीच मोदींच्या सभेच्या ठिकाणी अपघात झाला आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे, जवळच्या रुग्णालयात उपचार त्यांच्यावर सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मुंबईतील बीकेसी मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदींच्या सभेसाठी या मैदानावर मोठा जनसमुदाय दिसत असताना मैदानाच्या बाहेरील बाजूस उभारलेली तात्पुरती कमान कोसळल्याने सभेच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सभेच्या ठिकाणी कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून ढासळलेली कमान तातडीने हटवून सुव्यवस्था राखण्याचे काम आयोजकांकडून करण्यात आले.