
भोंग्यांसंदर्भातील निर्णय हा काही राज ठाकरे यांनी घ्यायचा नाही. रविवारी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करून समाजातील भावना भडकवण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांचे कालचे भाषण पोलीस ऐकतील, त्यानंतर काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याबाबत निर्णय घेतील, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सोमवारी केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन झाले आहे का, याबाबत बोलताना वळसे-पाटील म्हणाले, यासंदर्भात औरंगाबादचे पोलीस आयुक्त सोमवारी त्यासंदर्भातील व्हिडीओ पाहतील. त्यात अटी-शर्तींचे कुठे कुठे उल्लंघन झाले, याचा आढावा घेतील. कायदेशीर सल्ला घेतील. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवतील. त्यानंतर त्याबाबत पोलीस महासंचालक निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मंगळवारी राज्यातील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. समाजातील लोकांनी कोणत्याही समाजविघातक शक्तींना बळी ना पडत शांतता आणि सलोखा ठेवावा. कोणी तेढ निर्माण करीत असेल तर त्यांना साथ देऊ नये, असे आवाहन वळसे-पाटील यांनी यावेळी केले.