दहीहंडी आणि गणेशोत्‍सव सणांमध्ये राज्‍यातला राजकीय संघर्ष पोहोचणार

सार्वजनिक मंडळांवर आपलेच वर्चस्‍व असावे, यासाठी राजकीय नेत्‍यांची धडपड सुरू आहे.
दहीहंडी आणि गणेशोत्‍सव सणांमध्ये राज्‍यातला राजकीय संघर्ष पोहोचणार

महाराष्‍ट्रात एकनाथ शिंदे यांनी राजकीय भूकंप घडवून सत्‍तांतर केले आणि ते मुख्यमंत्री झाले. अद्याप राज्‍यातील सत्तासंघर्ष थांबलेला नाही. एका बाजूला एकत्र येण्यासाठी प्रयत्‍न आणि दुसऱ्या बाजूला राजकीय कुरघोडी अशीच वाटचाल दोन्ही बाजूंची सध्या सुरू आहे. आता दहीहंडी आणि गणेशोत्‍सव हे सण अगदी तोंडावर आले आहेत. गेल्‍या काही वर्षांत या सणांनी घेतलेले राजकीय स्‍वरूप पाहता दहीहंड्यांच्या थरांमध्ये आणि गणपती मंडपांपर्यंत राज्‍यातला राजकीय संघर्ष पोहोचणार, हे निश्चित. त्‍यातच महानगरपालिका निवडणुकादेखील तोंडावर आल्‍याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी महानगरांमध्ये ‘बॅनरबाजां’चे पेवच फुटले आहे. सार्वजनिक मंडळांवर आपलेच वर्चस्‍व असावे, यासाठी राजकीय नेत्‍यांची धडपड सुरू आहे. त्‍यातच हा नवा राजकीय संघर्ष आणखीन धार आणणार आहे.

पूर्वी दहीहंडी आणि गणेशोत्‍सव म्‍हटले की, मुंबईच नंबर वन असायची; मात्र आता किमान दहीहंडीबाबत तरी हा फोकस मुंबईवरून दूर होऊन पूर्णपणे ठाण्यावर स्ि‍थरावला आहे. गणेशोत्‍सवाच्या बाबतीत मात्र मुंबईचे स्‍थान अद्याप तरी अढळ आहे. ठाण्यातील संकल्‍प प्रतिष्‍ठान, संस्‍कृती युवा प्रतिष्‍ठान, टेंभी नाका येथील मानाची धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्‍मरणार्थ आयोजित करण्यात येणारी दहीहंडी, अशा प्रमुख हंड्या आहेत. ठाण्यात मनसेचीदेखील हंडी असते. ठाण्यातच नऊ थरांचेही विक्रम रचण्यात आले आहेत. आता तर शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मागणी केल्‍यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केली आहे.

शिवसेनेच्या जडणघडणीत या सणांचे फार मोठे महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरोधात एकत्र येण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्‍सव सुरू केला. मुंबईत कालांतराने दहीहंडी, गणेशोत्‍सव या सणांच्या माध्यमातून शिवसेनेने आपले अस्ि‍तत्‍व निर्माण केले. मुंबईतील बहुतांश राजकीय कार्यकर्ते हे या दहीहंडी तसेच गणपती मंडळांच्या मांडवाखालीच तयार झाले. आधी केवळ धार्मिक, सामाजिक स्‍वरूप असलेले हे सण आता पूर्णपणे राजकीय आवरणाखाली आच्छादले गेले आहेत. बहुतांश सार्वजनिक मंडळे ही राजकीय नेते वा पक्षांच्या दावणीला बांधली गेलेली आपल्‍याला आढळतील. मुंबई तसेच ठाण्यातील या मंडळांवर आधी पूर्णपणे शिवसेनेचा वरचश्मा होता; मात्र जसजशी ‘राजकीय उत्‍क्रांती’ होत गेली, नवनवीन पक्ष निर्माण होत गेले, तसतसा शिवसेनेचा वरचश्‍मा कमी होत गेला.

राष्‍ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षांनी या मंडळांवर चांगलीच पकड निर्माण केली. आता तर शिवसेनेसमोर शिंदे गटाचे मोठे आव्हान आहे. ठाण्यात तर खासदार राजन विचारे वगळता पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच एकहाती वर्चस्‍व आहे. त्‍यामुळे दहीहंडीच्या सणावर या वर्षी ठाण्यात तरी शिंदे गटाचेच पूर्ण वर्चस्‍व असणार आहे. दहीहंडीचा सण एकच दिवस साजरा करण्यात येतो. सार्वजनिक गणेशोत्‍सव मात्र १० दिवस साजरा करण्यात येत असल्‍याने त्‍यात राजकारण्यांना जास्‍त वाव असतो. त्‍यातच यावर्षी महानगरपालिकांच्या निवडणुकादेखील तोंडावर आहेत. त्‍यामुळे राजकारणी आपली प्रसिद्धी करण्यासाठी गणपतीचा विशेष धावा करणार, हे सांगण्याची फारशी गरज नाही. मुंबईतल्‍या गणपती मंडळांना जास्‍त महत्त्व आहे. त्‍यामुळे शिवसेना आणि शिंदे गट शिवसेना असा संघर्ष गणेशोत्‍सवात बघायला मिळणार आहे. प्रसिद्धीसोबतच राजकारण्यांसाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्‍हणजे या मंडळांशी जोडले गेलेले तरुण कार्यकर्ते. हीच कार्यकर्त्यांची फौज आपल्‍या पंखाखाली ठेवण्यासाठी नेत्‍यांची धडपड सुरू असते. निवडणुकांच्या वेळेला हीच फौज कामी येत असते. पदांवर असलेले लोकप्रतिनिधी तसेच इच्छुक उमेदवार यांच्या एरवी वर्गणीसाठी या मंडळांना नाकदुऱ्या काढाव्या लागत असतात; मात्र यावर्षीची राजकीय परिस्‍थिती पाहता मंडळांची चांदी असल्‍याचेच दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in