खड्ड्यात गेले राजकारण !

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची जगभरात ओळख आहे
खड्ड्यात गेले राजकारण !

खड्डे आणि राजकारण हे समीकरण मुंबईकरांसाठी नवीन नाही. पावसाळा सुरू झाला की, खड्ड्यावरून राजकारण ढवळून निघते. खड्डे अन‌् खड्डे, एकच ओरड नेते मंडळींकडून होत असल्याने असे वाटते की, यापुढे रस्ते खड्डेमुक्त असतील. खड्ड्याच्या प्रश्नावरून नेते मंडळी तापले की, सर्वसामान्य माणूसही उखडतो. कोणी खड्ड्यावर गाणं लिहितं, तर कोणी खड्डे बुजवण्यात भ्रष्टाचार झाला, अशी ओरड करतो; मात्र महागाई, खड्डेमय रस्ते आरोग्य सेवेचा बोजवारा या सर्वसामान्यांच्या गंभीर विषयाकडे नेते मंडळींकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आपल्या नशिबी खड्डेच यावर समाधान व्यक्त करत सर्वसामान्यांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडतो, खड्ड्यात गेले राजकारण.

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची जगभरात ओळख आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करणे सर्वपक्षीय नेते मंडळींचे स्वप्न असणे स्वाभाविक आहे. ४५ हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेतील सत्ता मिळवणे हे एकच लक्ष्य नेते मंडळींचे. २० ते २५ वर्षे एकत्र सत्तेचा उपभोग घेणाऱ्या भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद झाला अन् दोन मित्रपक्ष आज राजकीय शत्रू झाले आहेत. २०१९ सत्तेचा घास तोंडाशी आला आणि शिवसेनेने काढून घेतला, असा आरोप भाजप नेते मंडळींकडून होत असला तरी तो आरोप सत्तेसाठी आहे. तर भाजपने पाठीत खंजीर खुपसला, असे सांगत शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हात मिळवणी केली आणि राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली. अडीच वर्षे शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सत्तेचा उपभोग घेतला. अडीच वर्षांच्या काळात शिवसेनेत अंतर्गत वादाचा विस्फोट झाला आणि एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि त्यांच्या बंडाळीला ४० आमदारांनी समर्थन दिले. अखेर भाजपने शिंदे गटाच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली; मात्र या सगळ्या राजकीय घडामोडीत सर्वसामान्य जनतेला काय मिळाले, याचा विचारही नेते मंडळींना पडला नसणार. महागाई, खड्डेमय रस्ते, आरोग्य सेवेचा बोजवारा हेच सर्वसामान्य जनतेच्या नशिबी आले. नेते मंडळींचे अर्थपूर्ण राजकारण हेच भविष्यात सर्वसामान्यांच्या जीवावर बेतू शकते, याची चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये होऊ लागल्याने आधी सुविधा द्या, खड्ड्यात गेले राजकारण, असा संताप व्यक्त होणे स्वाभाविक आहे.

सर्वपक्षीय नेते मंडळींच्या दृष्टीस खड्डे पडतात. कोट्यवधी रुपये खर्च करूनही ‘रस्ते खड्ड्यात’ असा आरोपही विरोधकांकडून होतो. सत्ताधारी रस्ते खड्डेमुक्त कसे झाले हे पटवून देण्यात धन्यता मानतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील दोन वर्षांत रस्ते खड्डेमुक्त असतील, असा विश्वास व्यक्त केला खरा; पण याआधीही सत्तेचा उपभोग घेतलेल्यांनी अशीच काहीशी घोषणा केली होती; मात्र आजही मुंबईतील रस्ते सुस्थितीत असल्याने खड्ड्यात गेले राजकारण, असे शब्द आपसूकच सर्वसामान्यांच्या तोंडातून बाहेर पडतात, यात दुमत नाही.

सोन्याचं अंडे देणारी कोंबडी म्हणून मुंबई महापालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वच राजकीय पक्षांचा. त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवणे हे प्रत्येक नेत्यांचे स्वप्न. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्ता स्थापन केलेल्या भाजपनेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर अशी घोषणाही केली. तर मुंबईत शिवसेनेला मानणारा मतदारराजा असला तरी अडीच वर्षांतच राज्यातील सत्तेतून पायउतार व्हावे लागलेल्या शिवसेनेने समोर मुंबई महापालिकेतील सत्तेचा मुकूट कायम डोक्यावर ठेवणे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यात खड्डेमुक्त रस्ते, मुबलक पाणी, दर्जेदार आरोग्य सुविधा या अपेक्षा मुंबईकरांच्या. प्रशासकीय राज्यवटीत काहीशा सुविधा देण्याचाही प्रयत्न होता; मात्र राज्यात सत्तांतर झाले की, मुंबई महापालिकेत प्रशासकीय कामकाजात मोठा अडथळा निर्माण होतोय तो नेते मंडळींचा. राज्यात सत्ताबदल झाला अन् त्याचे परिणाम मुंबई महापालिकेत दिसून येत आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in