
मुंबई : मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागातून निवृत्त झालेल्या सहाय्यक ७० वर्षीय पोलीस आयुक्त प्रदीप टेमकर यांनी सोमवारी आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात त्यांची अखेरची नियुक्ती झाली होती. ते माटुंगा पूर्व येथील देवधर रोड येथे असलेल्या गंगा हेरिटेज नावाच्या निवासी इमारतीत राहण्यास होते. प्रदीप सोमवारी त्यांच्या निवासस्थानी एकटेच होते. त्यांनी सातव्या मजल्यावरील त्यांच्या राहत्या घरातून उडी मारली. टेमकर यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रदीप यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप टेमकर यांना गेल्या काही वर्षांपासून नैराश्याने ग्रासले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यामुळे कुटुंबात कायम भांडणे होत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. एसीपी प्रदीप यांनी आत्महत्येचे पाऊल उचलण्यामागे हेच कारण असावे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.