
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर २१ फेब्रुवारीला शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची यांची मुख्य नेता म्हणून फेरनिवड करण्यात आली. तर भूमिपूत्रांना नोकरीत ८० टक्के स्थान देण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न, चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव, मराठी भाषेला अभीजात भाषेचा दर्जा देणे अशी मागणी करणारे ठराव पारित करण्यात आले. या बैठकीचे वैशिष्ट्ये म्हणजे शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच ठाकरे कुटुंबीयांपैकी कोणीही यावेळी उपस्थित नव्हते.
निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले. त्यानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. पक्षाचे सर्व आमदार, खासदार, मंत्री, प्रमुख पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे मुख्य नेता या नात्याने बैठकीला मार्गदर्शन केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना घेऊनच आपण पुढे चाललो आहोत. यामुळेच आपल्याला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे, याची जाणीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत करून दिली. कार्यकारिणीने शिंदे यांची पक्षाचे मुख्य नेते म्हणून फेरनिवड केली.
राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापनेबाबतचे सर्व अधिकार शिंदे यांना देण्याचा ठराव मंजूर केला. शिवसेना पक्ष निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करेल, असे या बैठकीत ठरले आहे. दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची शिस्तपालन समितीही यावेळी कार्यकरिणीने स्थापन केली. शंभूराज देसाई आणि संजय मोरे या समितीत असणार आहे. पक्षविरोधात जे कोणी कारवाया करतील त्यांच्यावर ही समिती कारवाई करणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीला मुख्यमंत्री शिंदे, खासदार गजानन कीर्तिकर, रामदास कदम, आनंदराव अडसूळ आदींनी संबोधित केले.
कार्यकारिणीने राज्य आणि पक्षाच्या हिताचे अनेक ठराव पारित केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याबाबत, देशाच्या महान व्यक्तींच्या यादीत जिजामाता भोसले आणि अहिल्याबाई होळकर यांचा समावेश करण्याबाबतची मागणी करणारा ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीने मंजूर केला आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. चर्चगेट स्थानकाला चिंतामणराव देशमुखांचे नाव देण्यात यावे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. राज्यातील तरूण स्पर्धा परिक्षेकेडे वळावे याासठी राज्यात प्रशिक्षण वर्ग तयार करावेत हे ठराव देखील संमत करण्यात आले. मागील आठ महिन्यात सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेत़त्वाखाली जे काम केले त्या कामाची नोंद घेऊन सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.