
मुंबई : टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी एका व्यक्तीचे अपहरण करून त्याचा हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाँटेड असलेल्या पंजाबच्या दोन रेकॉर्डवरील गँगस्टरना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. पंचमनूर सिंग आणि हिमांशू माटा अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांचा ताबा पंजाब पोलिसाकडे सोपविण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांनी सांगितले.
१३ ऑक्टोबरला पंजाबच्या जालंधर पोलीस ठाण्यात कट रचून हत्येचा प्रयत्नासह अपहरण, मारहाण करणे व अन्य भादवी कलमांतर्गत एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यांतील आरोपी पंजाबहून मुंबईत पळून आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर शोधमोहीम सुरू असताना प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर व त्यांच्या पथकाने कुर्ला येथील एलबीएस मार्ग, कामरान रेसीडेन्सी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून पंचमनूर सिंग आणि हिमांशू माटा या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान ते दोघेही याच गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले.
दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध पंजाबच्या विविध पोलीस ठाण्यात घातक शस्त्रांनी हत्येचा प्रयत्न करणे, दशहत निर्माण करणे, हत्यारांची तस्करी करणे आदी ११ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांनी स्वत:च्या टोळीशी दहशत निर्माण करण्यासाठी संबंधित व्यक्तीचे अपहरण करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे उघडकीस आले. अटकेनंतर या दोघांचा ताबा जालंधर पोलिसाकडे सोपविण्यात आला आहे.