रेल्वे प्रवाशांना अतिरिक्त ‘स्पेस’ मिळणार

नवीन प्रकल्पांतर्गत अतिरिक्त एस्कलेटर्स व लिफ्ट सुरू केली जाणार आहे
रेल्वे प्रवाशांना अतिरिक्त ‘स्पेस’ मिळणार

मुंबई : मुंबईतील रेल्वे स्थानके गर्दीने भरून वाहत आहेत. या रेल्वे स्थानकात उभे राहायला जागा नसल्याचे चित्र दिसत असते. प्रवाशांना अतिरिक्त ‘स्पेस’ मिळण्यासाठी मुंबई रेल विकास महामंडळाने १७ रेल्वे स्थानकांचा विकास करण्याची योजना आखली आहे. यासाठी ९४७ कोटी रुपये खर्च होणार असून, त्यातून ६० हजार चौरस मीटर अतिरिक्त जागा मिळणार आहे.

मध्य व प. रेल्वे मार्गावर रोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. दोन्ही मार्गांवरील प्रत्येक स्थानक हे गर्दीने भरलेले असते. ही गर्दी आणखीन वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी स्थानकांचा विकास करण्याचे काम सुरू केले आहे. नवीन प्रकल्पांतर्गत अतिरिक्त एस्कलेटर्स व लिफ्ट सुरू केली जाणार आहे.

स्थानकातील गर्दी विभागण्यासाठी अतिरिक्त ‘स्पेस’ (जागा) तयार केली जाईल. त्यातून प्रवाशांची सोय होणार आहे, असे एमआरव्हीसीचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.

घाटकोपर, भांडुप, मुलुंड, डोंबिवली, कसारा, चेंबूर, जीटीबी नगर, गोवंडी, मानखुर्द, सांताक्रुझ, खार रोड, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई रोड आदींचा विकास केला जाईल. या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे प्रकल्प सध्या विविध टप्प्यात आहे. काही स्थानकांचे काम २०२४ मध्ये पूर्ण होईल, तर काहींचे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल. मात्र, १७ रेल्वे स्थानकांचे काम २०२५ पर्यंत पूर्ण करायचेच, असा निर्धार एमआरव्हीसी केला आहे.

नवीन डेक्स, फलाटांचे विस्तारीकरण, नवीन ब्रीज, स्कायवॉक यातून १०४७३ चौरस मीटर जागा तयार केली जाईल. विविध स्टेशनवर डेक्स उभारून अतिरिक्त ४० हजार चौरस मीटर जागा तयार केली जाईल. तसेच स्टेशनवर नवीन फूट ओव्हर ब्रीज उभारले जातील.

प्रवास सुसह्य होण्यासाठी सुविधा

अनेक रेल्वे स्थानकांवरील गर्दी वाढली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. प्रवाशांचा प्रवास सुसह्य होण्यासाठी या सुविधा दिल्या जाणार आहेत, असे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in