
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नुकत्याच मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने राज ठाकरे यांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली असून फक्त पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. राज यांच्या ताफ्यात एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी भोंग्याच्या विरोधात आंदोलन छेडल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. या धमकी पत्राच्या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केली होती. राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.